अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील चाहत्यांची लाडकी रियल लाईफ जोडी आहे. या जोडीचे सोशल मिडीयावरही मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. याच चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. कारण पहिल्यांदाच सिद्धार्थ आणि मिताली यांनी एकत्र काम केलय. मात्र हे काम पाहता नाही तर ऐकता येणार आहे. 'स्टोरीटेल मराठी' या जगविख्यात ऑडिओबुकने खास नव्याने तयार केलेल्या त्यांच्या ओरिजनल ऑडिओबुक सिरीजमध्ये हे दांपत्य लग्नानंतर प्रथमच एकत्र आले आहेत.
'हौस हजबंड'(Haus Husband) असं या ऑडिओ सिरीजचं नाव आहे. रोहित आणि रेवा ज्याचं नुकतच लग्न झालय, एकमेकांच्या सुपर प्रेमात असलेलं हे कपल आहे. पण त्यांच्या नवरा बायकोच्या रोलबद्दलच्या कॉन्सेप्ट जरा उलट्यापालट्या आहे. पण आजूबाजूची जालिम दुनिया त्यांना पाहिजे तसं जगू देत नाही. घरात येणाऱ्या मदतनीस ताईंपासून ते पार्कातल्या काकांपर्यंत आणि मित्रमैत्रिणींपासून ते दोघांच्या सासवांपर्यंत सगळे मिळून या दोघा बिचाऱ्यांना सॉलिड सासुरवास उर्फ मेंटल टॉर्चर करतायत. अशा वेळी या दोघांची टीम सॉलिड राहते का? त्यांच्यात जालिम दुनिया फूट पाडते का ? रेवाचा स्वयंपाक आणि रोहितचा जॉब याचं नेमकं काय होतं? त्याची एक सॉलिड रोमँटिक यूथफुल गोष्ट म्हणजेच 'हौस हजबंड' ही सिरीज आहे. या नव्या माध्यमाशी एकरूप झालेल्या चतुरस्र युवा लेखिका गौरी पटवर्धन यांच्या लेखणीतून 'हाऊस हजबंड' उतरले आहे.
तेव्हा खऱ्या आयुष्यात पति-पत्नीची भूमिका निभावणारं हे कपल या ऑडिओ सिरीजच्या माध्यमातून रिल लाईफ कपलच्या रुपात ऐकायला मिळतील. तेव्हा सिद्धार्थ आणि मितालीच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच ठरेल.