By  
on  

झाशीची राणी लक्ष्मीबाईंचा इतिहास झळकणार आंतरराष्ट्रीय पातळीवर

1857 च्या रणसंग्रमात आपल्या असामान्य पराक्रमाने ब्रिटींशांसोबत लढा देणारी शूर वीरांगना झाशीची राणी यांचे नाव माहित नाही, असा एकसुद्दा व्यक्ती सापडणार नाही. लहानांपासून थोरांपर्यंत सा-यांनाच राणी लक्ष्मीबाईंचा महान इतिहास ज्ञात आहे. 1857 च्या उठावाची क्रांतीज्योत पेटवणा-या राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनपट आता आंतरराष्ट्रीय पातळीवर उलगडणार आहे. राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित ‘स्वोर्डस अॅंड सेपटर्स’ हा हॉलिवूडपट लवकरच प्रदर्शित होत आहे.

शूर वीरांगना राणी लक्ष्मीबाईंचे नाव भारताच्या इतिहासात अजरामर आहे. हाच इतिहास आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वांना समजून घेता यावा, म्हणूनच भारतीय कलाशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि भरतनाट्यम विशारद असलेल्या स्वाती भिसे यांनी ‘स्वोर्डस अॅंड सेपटर्स’ या सिनेमाच्या लेखन, निर्मिती व दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अभिनेत्री देविका भिसे या सिनेमात राणी लक्ष्मीबाईंच्या प्रमुख व्यक्तिरेखेत झळकणार आहे. तसंच अभिनेते अजिंक्य देव यांचीसुध्दा सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका असून यतीन कार्येकर, नागेश भोसले, सिया पाटील आणि पल्लवी पाटील या कलाकारांनासुध्दा या हॉलिवूडपटात महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखांमधून पाहायला मिळणार आहे.

‘स्वोर्डस अॅंड सेपटर्स’ हा हॉलिवूडपटाचं पोस्टर नुकतंच एका शानदार सोहळ्यात लॉन्च करण्यात आलं. यावेळी सिनेमातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ समूह उपस्थित होते. हा सिनेमा इंग्रजीत असला तरी काही संवाद मराठी आणि हिंदी भाषेत जाणीवपूर्वक चित्रित करण्यात आले आहेत.

स्वातंत्रपूर्व भारतातील ब्रिटीश राजवटीला लढा देणा-या वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जीवनपट उलगडणारा ‘स्वोर्डस अॅंड सेपटर्स’ भारताबरोबरच जगभरात लवकरच प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. सर्वांनाच या ऐतिहासिकपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive