अभिनेत्री जेनेलिया देशमुखवर वाढदिवसानिमित्ताने आज शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सोशल मिडीयावर जेनेलियाला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांकडून आणि तिच्या चाहत्यांकडून शुभेच्छा मिळत आहेत. यातच एका खास व्यक्तिकडूनही तिला शुभेच्छा मिळाल्यात. ही खास व्यक्ति दुसरी कुणी नसून तो आहे जेनेलियाचा पति अभिनेता रितेश देशमुख.
रितेशने पत्नीच्या वाढदिवसानिमित्ताने एक खास भेट सोशल मिडीयावर शेयर केली आहे. या खास पोस्टमध्ये त्याने एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत रितेशचे जेनेलियासोबतचे खास रोमँटिक, मजेशीर क्षण आहेत. एवढच नाही तर या पोस्टचं कॅप्शन मात्र चांगलच लक्षवेधी ठरलय. रितेशने नेहमीप्रमाणे ही हटके पोस्ट करत जेनेलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या पोस्टमध्ये रितेश स्वत:लाच अंकल म्हणतोय. याचं कारण असं की जेनेलिया दिवसेंदिवस तरुण दिसत असल्याच रितेश म्हणतोय. पण लवकरच लोकं त्याला अंकल म्हणतील असाही मजेशीर उल्लेख त्याने यात केलाय.
रितेश या पोस्टमध्ये म्हणतो की, "देवाने माझ्यावर प्रेम केलं पाहिजे. यापेक्षा जबरदस्त भावना नसू शकते की सकाळी लवकर उठून दररोज तुझा चेहरा पाहणं. आपण सोबत घालवलेल्या 20 वर्षांकडे वाटचाल करताना असं वाटतं की हे सगळं कालच घडलं. एक उत्तम पार्टनर असण्यासाठी धन्यवाद. वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको. तू दिवसेंदिवस तरुण दिसत आहेस. माझ्याविषयी मी हे बोलू शकत नाही. लवकरच लोकं म्हणतील जिनिलिया के साथ ये अंकल कौन है।"
ही पोस्ट पाहुन जेनेलियालाही आनंद झालाय. म्हणूनच तिनेही या पोस्टवर रिप्लाय करत "मी तुझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त प्रेम करते" असं म्हटलय.