परिस्थिती आपल्याला काय काय करायला शिकवते, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाही. आपल्यातील प्रत्येकजण आज विविध परिस्थितीतून गेलाय आणि जातोय. कोकणातील पूरग्रस्तांवर तर शून्यातून पुन्हा नवं विश्व उभं करण्याची वेळ आलीय हे ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर आहेच. असंच खडतर परिस्थितीशी सामना करुन पुन्हा नव्याने सर्व विश्व उभं करणा-या एका अभिनेत्रीचा प्रेरणादायी प्रवास आपण जाणून घेऊयात.
आई कुठे काय करते, ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय कौटुंबिक मालिका. गेले दीड दोन वर्ष या मालिकेवर प्रेक्षक जीव ओवाळून टाकतायत. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलंय. मालिकेत सर्वात जास्त टिकेचा आणि तिरस्काराची धनी होणारी व्यक्तिरेखा म्हणजे संजनाची. ही संजना साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले चाहत्यांच्या प्रचंड आवडीची आहे. सोशल मिडीयावरसुध्दा तिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. परंतु लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसलेचा इथपर्यंतचा प्रवास अजिबातच सोप्पा नव्हता. स्वप्नील जोशींच्या “शेअर विथ स्वप्नील” या रेडिओ शोमध्ये तिने आपली खडतर कहाणी सांगितली आहे.
रुपाली भोसले आज यशाच्या शिखरावर असली तरी इथपर्यंत येण्यासाठी तिने अपार मेहनत घेतली होती. ह्याची सुरुवात झाली ती त्यांच्या कुटुंबात आलेल्या एका वादळामुळे. रुपाली मुंबईच्या बीडीडी चाळीत लहानाची मोठी झाली. नववीत शिकत असताना तिच्या काकाने वडिलांना एक स्कीम सुचवली.
या स्कीममध्ये रुपालीच्या वडिलांनी जवळ होते नव्हते तेवढे सगळे पैसे काकांकडे सुपूर्त केले होते. या स्कीममुळे रुपालीच्या वडिलांची फसवणूक झाली आणि तिच्या काकांना अटक करण्यात आली. मात्र यामुळे रुपालीचे संपूर्ण कुटुंबच रस्त्यावर आले होते. अक्षरशः खाण्यासाठी देखील त्यांच्या हातात पुरेसे पैसे नव्हते. डोक्यावरचं छत्रसुध्दा गेलं. रस्त्यावर भर पावसात त्यांना वणवण करावी लागली. . रुपाली आणि तिचा लहान भाऊ पावसाने भिजू नये म्हणून आईने त्यांच्या डोक्यावर ताडपत्री धरली होती. अशा कठीण प्रसंगाला तोंड देत असताना रुपालीच्या आईला दोन वेळा हृदयाचा झटका येऊन गेला. हे कुटुंब रस्त्यावर दिवस काढतय हे पाहून रुपालीच्या वडिलांचे एक मित्र त्यांच्या मदतीसाठी धावून आले होते. रुपालीच्या वडीलांच्या मित्रांनी या कुटुंबाला एक छोटी पत्र्याची खोली रहाण्यासाठी शोधून दिली.
या पत्र्याच्या खोलीत अगोदर गुरे बांधली जायची परंतु दुसरा पर्याय नसल्याने त्या गोठ्यात त्यांना राहावे लागले. गोठ्यात तात्पुरती राहण्याची सोय झाली असली तरी त्याच्या भिंतींना अनेक तडे गेले होते. त्याला मोठमोठाली छिद्र देखील पडली होती. बाहेरील बाजूने आतमध्ये सहज डोकावता येऊ शकत असल्याने रुपाली पहाटे ३ वाजता उठून अंघोळ उरकून घ्यायची.
या काळात रुपाली नववीत होती, परिस्थितीमुळे तिला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. रुपालीचा भाऊ लहान होता मात्र त्याला आपल्या कुटुंबाची होणारी वाताहत कळत होती. यातूनच त्याच्या मनात एकदा आत्म’हत्या करण्याचा विचार आला. हे पाहून रुपालीने नोकरी करायचा निर्णय घेतला. अपार मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने आपल्या कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला.
केवळ नववी इयत्तेपर्यंत शिक्षण झालेल्या रुपालीने पुढे जाऊन हिंदी मालिकांमध्ये स्थान मिळवले. मालिका , चित्रपट, बिग बॉसचं घर असा तिचा हा प्रवास खरंच सूर्याच्या किरणांप्रमाणे झळाळता आहे.
कुटुंबाला सावरुन सिनेसृष्टीत यशोशिखरावर पोहचलेल्या रुपालीच्या या खडतर प्रवासाचं आणि प्रामाणिक प्रयत्न व कष्टाचं कौतुक करावं तितकंच कमी आहे. आई कुठे काय मालिकेतील तिची संजना ही भूमिका आज प्रचंड लोकप्रिय आहे आणि तिची ओळख बनलीय.
रसिक प्रेक्षकांची तिला मिळणारी तिरस्काराची प्रतिक्रीया हीच तिच्या कामाची पोचपावती आहे.