जान्हवी कपूर आणि ईशान खत्तर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘धडक’ सिनेमाला प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला तर बॉक्स ऑफिसवरसुध्दा या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली. जान्हवी कपूरच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. जान्हवीच्या पदार्पणाच्या सिनेमातील दमदार अभिनयामुळेच दिग्दर्शक शशांक खेतान यांनी तिला आपल्या आगामी सिनेमासाठी साईन करण्याचा विचार केला आहे.
‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ आणि ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ या दोन सिनेमांचे दिग्दर्शन करणारे शशांक खेतान आपला आगामी सिनेमा ‘रणभूमि’साठी वरुण धवनसोबत जान्हवी कपूरला नायिका म्हणून घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘रणभूमी’ हा नातेसंबंध व बदल्याच्या भावनेवर आधारित कथानकावर बेतलेला सिनेमा आहे. 2020च्या दिवाळीत हा सिनेमा प्रदर्शित होईल.
https://twitter.com/karanjohar/status/965427458525851648
फेब्रुवारीमध्ये ट्विटरद्वारे करण जोहरने शशांक खेतान आणि वरुण धवन यांच्यासोबतचा फोटो शेअर करत ‘रणभूमी’ या सिनेमाची घोषणा केली होती. परंतु पाच महिन्यानंतरसुध्दा या सिनेमातील भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले नव्हते. सुरुवातीपासूनच याबाबत खुलासा झाला नव्हता. यापूर्वी वरुणसोबत आलिया भट्ट झळकणार असल्याची चर्चा होती. पण या चर्चेला पूर्णविराम मिळत आहे, लवकरच आता जान्हवी कपूरच्या नावावर या सिनेमाची अभिनेत्री म्हणून शिक्कामोर्तब केले जाईल.
दिग्दर्शक –निर्माता करण जोहर हे आलिया भट्ट, सिध्दार्थ मल्होत्रा, वरुण धवन, जान्हवी कपूर यांचे मार्गदर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखले जातात.