अभिनेत्री अमृता खानविलकरची मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळख आहे. चित्रपट, मालिका, सिरीज, जाहिराती, रिएलिटी कार्यक्रम या विविध माध्यमातून अमृता प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. सोशल मिडीयावरही अमृताचा मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी अमृता काहीतरी नवं घेऊन आलीय.
सध्या सोशल मिडीया, युट्यूबचं विश्व आहे. चक्क माधुरी दीक्षितपासून अनेक कलाकारांनी स्वत:चे युट्यूब चॅनेल सुरु केले आहे. यातच या ट्रेंडमध्ये अमृता कशी मागे राहील. अमृतानेही तिच्या चाहत्यांसाठी युट्यूबर बनायचं ठरवलय. नुकतच अमृताने तिचं युट्यूब चॅनेल लाँच केलय.
या चॅनेलच्या माध्यमातून चाहत्यांना अमृताच्या लाईफस्टाईलमध्ये डोकावता येणारेय. आपल्या आवडत्या कलाकाराचा दिनक्रम, त्याच्या आवडीनिवडी, त्याच्या आवडत्या जागा, पदार्थ अशा सगळ्याच गोष्टी जाणून घेण्याची प्रत्येक चाहत्याला उत्सुकता असते. अमृताने हाच नजराणा आपल्या चाहत्यांसाठी खास आणला आहे. यात अमृताचा सकाळचा दिवस कसा सुरु होतो, स्वतःला फिट ठेवण्यासाठी ती काय करते, तिचा डाएट, तिला कशा प्रकारचे कपडे घालायला आवडतात, कुठे फिरायला, शॉपिंगला आवडते, आईसोबत ती कसा वेळ घालवते, एकंदर तिचे लाइफस्टाईल, तिच्या आवडीनिवडी, नृत्य, अभिनय अशा तिच्यासंबंधित अनेक गोष्टींचा उलगडा यात होणार आहे. या संदर्भातील पहिला व्हिडिओ तिने शेअर केला असून त्याला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमृताने 'अमृतकला'च्या अंतर्गत विविध डान्स व्हिडीओ शेयर करत तिच्या नृत्याची आवड जोपासली होती. त्यालाही चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. म्हणूनच अमृताने अधिकृतरित्या स्वतःचे युट्यूब चॅनेलही आता सुरु केलय. या नव्या उपक्रमाबद्दल अमृता म्हणते की, '' खरं सांगायचे तर 'अमृतकला'ला मिळालेल्या चाहत्यांच्या प्रतिसादानंतरच स्वतःचे युट्यूब चॅनेल सुरु कारण्यासाठी अधिक प्रेरित झाले. चाहत्यांना नेहमीच त्याच्या आवडत्या कलाकाराच्या लाइफस्टाईलविषयी कुतूहल असते आणि म्हणूनच मी माझ्या चाहत्यांसोबत माझ्या आयुष्यातील काही गोष्टी शेअर करणार आहे. यात अनेक गोष्टींचा समावेश असेल. हळूहळू ते तुम्हाला कळेलच. सध्यातरी महिन्याला किमान चार -पाच व्हिडिओ शेअर करण्याचा विचार आहे. पुढे बघू कसे जुळून येतेय.''