अभिनेता-दिग्दर्शक सुबोध भावेच्या सिनेमांची सर्वच जण आतुरतेने वाट पाहात असतात. सुबोध सिनेसृष्टीतील एक गुणी अभिनेता म्हणून ओळखला जातो. सुबोध भावे लिखित आणि अभिनित ‘पुष्पक विमान’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
आजोबा आणि नातावाच्या हळव्या नात्याची ही हदयस्पर्शी कथा आहे. झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‘पुष्पक विमान’ या सिनेमाचे दिग्दर्शन वैभव चिंचाळकर यांनी केले आहे. सुबोध भावे आणि मोहन जोशी हे कलाकार रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार असून अभिनेत्री गौरी किरण या सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.
विष्णुदास वाणी म्हणजेच तात्यांभोवती सिनेमाची कथा गुंफण्यात आली आहे. तात्या जळगावमध्ये राहणारे वयाची ८३ गाठलेले व्यक्तिमत्व. कीर्तन, भजन आणि शेती ह्यात आयुष्य वेचलेल्या तात्यांना तुकाराम महाराजांची वैकुंठ गमन ही कथा नेहमीच भुरळ घालते. तुकारामांना वैकुंठवासासाठी पुष्पक विमान न्यायला आले. याचे त्यांना फार अप्रूप वाटते. एकदा तात्या आपल्या एकुलत्या एक नातवाच्या म्हणजेच विलासच्या आग्रहाखातर जेव्हा मुंबई गाठतात तेव्हा मुंबईतील घुसमट त्यांना सहन होत नाही. कधी एकदा मुंबई सोडतो असे झालेले असताना, दरम्यान अचानक तात्यांना मुंबईत विमान उडताना दिसते आणि यामुळे त्यांच्या जीवनाला अचानक कलाटणी मिळते.'तुकाराम महाराजांसारखी पुष्पक प्रवासाची' तात्यांची इच्छा पूर्ण होईल का, हे आपल्याला सिनेमातच पाहावं लागेल.
‘पुष्पक विमान’ हा सिनेमा येत्या ३ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.