ग्रामीण कथेवर आधारित रहस्यमय 'परीस' ही वेबसिरीज नुकतीच 'प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रदर्शित झाली आहे. या वेबसिरीज मधील 'गूढ' हे प्रेमगीत नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचे बोल आणि संगीत निरंजन पेडगावकर यांचे असून जयदिप वैद्य यांनी हे गाणे गायले आहे. ग्रामीण कथा असलेल्या ‘परीस’मधील या गाण्याचे बोल अतिशय श्रवणीय असून यातील ग्रामीण लहेजा आणि गावरान शब्द विशेष लक्षवेधी ठरतायत.
लोखंडाला परीसाचा स्पर्श झाल्यास त्याचे सोने होते. ही गोष्ट गावातील काही लोकांना समजते आणि ते परीसाच्या शोधात निघतात. या शोधादरम्यान एका तरुण - तरुणीचे एकमेकांवर प्रेम जडते. त्यांच्या या प्रेमाचा प्रवास आपल्याला 'गूढ' या प्रेमगीतामधून पाहायला मिळतोय.
यात त्यांना तो परीस सापडतो का? तो मिळवण्यासाठी ते कोणत्या थराला जातात? त्या जोडप्याचे पुढे काय होते ? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी प्रेक्षकांना 'परीस' ही वेबसिरीज पाहावी लागेल.