अभिनेता जितेंद्र जोशीने आत्तापर्यंत साकारलेल्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र गोदावरी या चित्रपटातून जितेंद्र जोशीने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलय. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या सिनेमाशी जोडलेली कलाकार मंडळी आणि उत्तम टीम. मात्र प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने थेट सातासमुद्रापार मजल मारलीय.
‘व्हॅन्कुवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल’ साठी या सिनेमाची निवड झाली असून या फेस्टीवलमध्ये 'गोदावरी'चा वर्ल्ड प्रिमिअर होणार आहे. ही आनंदाची बातमी जितेंद्र जोशीसह या चित्रपटातील कलाकारांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिलीय.
या पोस्टमध्ये लिहीलय की, "आम्ही ठरवलं होतं एक कागदाची होडी करु आणि सोडू नदीत. जिथे जिथे पोहोचेल तिथून हाक येईल. पाहू कुठं कुठं पोहोचते. पहिली हाक आलीय….व्हॅन्कुवर (कॅनडा) इथून. गोदावरी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकणार ‘व्हॅन्कुवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल’ मध्ये. गोदावरीचा वर्ल्ड प्रिमिअर ! नदीत सोडलेली आठवण जितकी गहिरी … तितके नदीचे तरंग दूरवर पसरतात. पहिलाच तरंग कॅनडापर्यंत गेलाय. गोदावरी उगमाचे साक्षीदार व्हा ! आशिर्वाद असु द्या."
या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, जितेंद्र जोशी, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव, सखी गोखले, संजय मोने हे कलाकार झळकणार आहेत.