ब-याच मोठ्या कालवधीनंतर अभिनेता अंकुश चौधरी छोट्या पडद्याकडे वळला आहे. मी होणार सुपरस्टार या डान्स शोचं तो परिक्षण करतोय, पहिल्यांदाच रिएलिटी शोच्या परिक्षणाची जबाबदारी त्याच्यावर आहे. त्यामुळे अंकुश छोट्या पडद्यावर पाहून प्रेक्षकांसोबतच डान्सच्या स्पर्धकांचासुध्दा उत्साह तितकाच द्विगुणीत झाला आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील नृत्यप्रेमींना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी एक मोठे व्यासपीठ मिळालं आहे. यातील एक स्पर्धक सोनू कदम याला देखील संधीचं सोनं करायचं आहे. परंतु त्याच्यासमोर अनेक आर्थिक अडचणी आहेत. शोमध्ये नुकताच गणेशोत्सव स्पेशल एपिसोड पार पडला. या भागात सोनूनं माऊली- माऊली या गाण्यावर नृत्य सादर केलं. त्याचा डान्स सर्वांनाच आवडला. परंतु शोमध्ये येण्यासाठी त्यानं त्याची नोकरी सोडल्याचं आणि त्यामुळं घरासाठी घेतलेलं चार लाखाच्या कर्जाचे हफ्ते थकले आहेत, असं त्यानं सांगितलं.
सोनूचं डान्सप्रेम आणि जिद्द पाहून अभिनेता अंकुश चौधरीनं 'तुझ्या हफ्त्यांचे जे काही पैसे असतील ते मी देतो, तू काळजी करू नको' असा शब्द दिला. अंकुशनं हे सांगताच, सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं.त्याच्या प्रतिक्रीयेने अवघ्या महाराष्ट्राची मनं त्याने पुन्हा एकदा जिंकली.