मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात आपल्या ग्लॅमरस लूक आणि हटके अंदाजात प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी बिनधास्त व बोल्ड अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने या कार्यक्रमात स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं. पण बिग बॉसच्या घरात एक आरोप तिच्यावर सतत केला जायचा, तो म्हणजे, “स्मिता नेहमीच गोंधळलेली असते. तिचा निर्णय कशावरच ठाम नसतो.” परंतु याबाबतचं मौन सोडत एक स्पष्टीकरण स्मिताने नुकतंच दिलं आहे.
हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत स्मिताने याबाबतचा खुलासा केला, “ बिग बॉसच्या घरात मी माझ्या मराठी भाषेबाबत फार जागरुक असायची, एखादं चुकीचं वाक्य तोंडून बाहेर पडलं तर याचा काही उलट परिणाम होऊ नये आणि माझी विचार करण्याची प्रक्रिया ही इंग्रीजीत असते. म्हणूनच तुम्हाला वाटायचं मी गोंधळलेली आहे.”
स्मिता पुढे सांगते, “मराठी सिनेमात काम करणं मला अवघड वाटत नाही, तिथे स्क्रिप्ट्सनुसार पुढे कुठलं वक्तव्य केलं, जाणार हे आधीच माहित असतं आणि त्यावर दिली जाणारी प्रतिक्रियासुध्दा ठरलेली असते. परंतु बिग बॉसच्या घरात सतत मराठीतच बोललं जात असल्याने, मला सुरुवातीला थोडं ते कठीण व्हायचं. म्हणून मी शांत असायचे. पण नंतर संपूर्ण बिग बॉसच्या पर्वादरम्यान मी मराठी शिकले आणि मराठीतूनच संवाद साधायची.
बिग बॉस मराठीच्या घरात 90 दिवस स्पर्धक म्हणून राहिल्यानंतर,स्मिताला बाहेर आल्यावर एक आठवड्याचा ब्रेक घेऊन छान सुट्टी एन्जॉय करायची होती, पण सध्या तिच्या बिझी शेड्यूलमुळे ते शक्य नाही. ‘लव्ह बेट्टींग’ या आगामी मराठी सिनेमाच्या डबिंगमध्ये ती बिझी आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता चिराग पाटील झळकणार आहे. त्यानंतर ऑगस्ट ते सप्टेंबर हे दोन महिने ती एका मारठी सिनेमाच्या शुटींगसाठी लंडनला जाणार आहे.
स्मिताच्या मते, ती सकारात्मक व्यक्ती आहे आणि याचा प्रत्यय बिग बॉसच्या घरात सर्वांना आलाच असेल. ती म्हणते, “मी कुठलीच गैरवर्तवणूक कार्यक्रमादरम्यान केली नाही.मला नकारत्मकता आवडत नाही. मी जशी आहे, तशी माझ्या चाहत्यांना पाहायला मिळाली. बिग बॉसच्या घरात 90 दिवस पूर्ण केल्याचा आणि टॉप 3 स्पर्धकांमध्ये पोहचल्याचा मला आनंद असून यातच मी खुप समाधानी आहे.”