नाट्यवेड्या रसिकप्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपली आहे. लवकरच नाट्यगृहे सुरु होणार आहेत. मात्र यातच घरात बसलेल्या नाट्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीय. कारण इंग्रजी रंगभूमीवर अजरामर ठरलेले विल्यम शेक्सपिअर लिखित नाटक ‘हॅम्लेट’ हे मराठी नाटक वर्ल्ड टेलीव्हीजन प्रीमियरच्या माध्यमातून नाट्यरसिकांना पाहता येणार आहे.
हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्याचे शिवधनुष्य झी मराठी या वाहिनीने उचलले होते आणि या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड मिळाला. उत्कृष्ट निर्मितीमूल्य आणि प्रदीप मुळ्ये यांनी साकारलेलं डोळे दिपवणारं भव्य दिव्य सेट त्यामुळे हे नाटक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलं. यात हॅम्लेटची प्रमुख भूमिका सुमित राघवन यांनी साकारलीय तर तुषार दळवी, सुनील तावडे, भूषण प्रधान, आशिष कुलकर्णी, ओंकार कुलकर्णी, रणजीत जोग, मनवा नाईक, मुग्धा गोडबोले हे कलाकार या नाटकात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मात्र हीच कलाकृती आता टेलिव्हिजनवर अनुभवता येणार आहे.
यानिमित्ताने नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणतात की, “कालातीत अशी ओळख असलेले 'हॅम्लेट' नाटक साकारावे असे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. रंगमंचावरून आता हे नाटक टेलिव्हिजनच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांच्या घरी पोहोचणार आहे. त्यामुळे १० ऑक्टोबरला होणाऱ्या या नाटकाच्या वर्ल्ड टेलीव्हीजन प्रीमियरसाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत."
60 र्षांपूर्वी नाना जोग, दामू केंकरे यांनी केलेल्या या नाटकाचे पुनर्लेखन 'प्रशांत दळवी' यांनी केले आहे, या नाटकाला संगीत दिलं आहे ‘राहुल रानडे’ यांनी. 'हॅम्लेट' नाटकाचा वर्ल्ड टेलीव्हीजन प्रीमियर 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर पाहता येईल.