'बाबू' सिनेमात ॲक्शनचा तडका, अंकित मोहनचा हटके लुक

By  
on  

बाबू या आगामी सिनेमातून अभिनेता अंकित मोहन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटील येतोय. नुकतीच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झालीय. यावेळी सिनेमाचा ॲक्शन सिक्वेन्स चित्रीत करण्यात आलाय. यात अभिनेता अंकित मोहनचे जबरदस्त ॲक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. अंकितने या सिनेमासाठी बरीच मेहनत घेतली आहे. या सिनेमातील लुकसाठी त्याने त्याच्या शरीरयष्टीवर मेहनत घेतलीय. 

नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या चित्रीकरणावेळी अंकितसोबत अभिनेत्री रूचिरा जाधवही उपस्थित होती. या सिनेमात अंकितसह रूचिरा जाधव आणि नेहा महाजन झळकणार आहे. यावेळी सिनेमाच्या सेटवर जबरदस्त ॲक्शन चित्रीत करण्यात आली. शिवाय अंकितचा हटके लुक सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. या सिनेमात अंकितचा लांब केसांचा आणि 90 च्या दशकाची आठवण करुन देणारा लुक पाहायला मिळेल.

 या सिनेमातील भूमिकेविषयी अंकित म्हणतो की, ‘’बाबू ही व्यक्तिरेखा माच्या खूप जवळची आहे. आमच्यात खूप साम्य आहे. त्यामुळे ही व्यक्तिरेखा साकारताना मला फार मेहनत घ्यावी लागली नाही. परंतु यातील ॲक्शन सीन्ससाठी मी मेहनत घेतली आहे. मी मार्शल आर्ट, कलरीपयट्टू शिकलो असल्याने मला त्याचा इथे खूप फायदा झाला. याआधीही मी ॲक्शन सीन्स केले आहेत. मात्र ऐतिहासिक आणि अशा प्रकारच्या ॲक्शन सीन्समध्ये खूप फरक आहे. ऐतिहासिक ॲक्शन सीन्स करताना तुमच्या हातात हत्यार असते तर अशा प्रकारच्या ॲक्शन सीन्समध्ये हातच तुमचे हत्यार असते. परंतु या दोन्ही सीन्समध्ये नियंत्रण आणि काळजी या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हे दोन्ही अनुभव मी घेतले आहेत.  ‘बाबू’मधील ॲक्शन सीन्स मी खूप एन्जॅाय केले.’’

श्री कृपा प्रॅाडक्शन निर्मित 'बाबू' या चित्रपटाचे निर्माता बाबू के. भोईर असून दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे हे आहेत. ॲक्शन सीन्सचा भरपूर तडका असलेला ‘बाबू’ हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी लवकरच चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.

Recommended

Loading...
Share