अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये गौरविल्या गेलेल्या ‘फनरल’ या मराठी चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. या आगामी मराठी चित्रपटाची ‘इफ्फी’ महोत्सवात ही वर्णी लागली आहे. गोव्यात पार पडणाऱ्या 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 2021 साठी या चित्रपटाची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. यात मराठीतील एकूण सहा चित्रपटांचा समावेश असून ‘फनरल’ या मराठी चित्रपटाने स्थान पटकावले आहे. येत्या 27 नोव्हेंबर रोजी इफ्फीमध्ये या चित्रपटाचा प्रिमियर होील. याआधी पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव, अंबरनाथ महोत्सव, राजस्थान चित्रपट महोत्सव या महोत्सवांमध्ये ‘फनरल’ चित्रपटाची निवड करण्यात आली. यातल्या अंबरनाथ व राजस्थान चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने पुरस्कार पटकावले आहेत.
सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचा विषय ‘फनरल’ या चित्रपटात मांडण्यात आलाय. सद्यस्थितीला धरून असलेला हा विषय प्रत्येकाला अंत:र्मुख करेल असे निर्माते, लेखक रमेश दिघे म्हणतात. तर दिग्दर्शक विवेक दुबे म्हणतात की, "आपल्या रोजच्या जगण्यातील भाव-भावनांचे प्रतिबिंब चित्रपटात उमटले पाहिजे, हाच विचार करुन सर्वसामान्यांच्या जीवनाला भिडणारा विषय ‘फनरल’ चित्रपटात मांडलाय". अभिनेता आरोह वेलणकर, विजय केंकरे, प्रेमा साखरदांडे, संभाजी भगत हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेता आरोह वेलणकरला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळालाय.
निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीने सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना देखील एक सामाजिक कथा ‘फनरल’ चित्रपटाच्या स्वरूपात मांडली आहे. याच ‘फनरल’ चित्रपटाचं आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होताना दिसतय.