कलर्स मराठी वाहिनीवर अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेत लवकरच एक नवे वळण येणार आहे. हे पाहून प्रेक्षकांना नक्कीच आश्चर्याचा धक्का बसणार आहे. मालिकेचा नायक प्रेम म्हणजेच अभिनेता सचित पाटील या मालिकेत आता दुहेरी भूमिका साकारतोय.
कश्यप नांदे या नवीन पात्राची मालिकेत दमदार एन्ट्री होणार आहे. या पात्राला पाहून मालिकेची नायिका राधा मात्र गोंधळून जाणार आहे. या दुहेरी भूमिकेबाबत बोलताना अभिनेता सचित पाटील म्हणतो, “राधा प्रेम रंगी रंगली मालिकेने आता नवं वळण घेतलं आहे. या मालिकेमध्ये मी आता दुहेरी भुमिकेमध्ये दिसणार आहे. कश्यप नांदेची भूमिका मी साकारणार आहे. मी आयुष्यात पहील्यांदाच डबल रोल साकारतोय. प्रेम या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता मला डबल रोल करण्याची संधी या मालिकेने दिली आहे. अप्रतिमरित्या मालिकेचे लिखाण होत आहे.”
सचित पुढे सांगतो, “कश्यप नांदे ही भूमिका प्रेम देशमुखच्या भुमिकेपेक्षा अगदी निराळी आहे. कश्यप आणि प्रेम यांच्यात कुठल्याही प्रकारचे साम्य नाही. कश्यप हा अतिशय गुंड प्रवृत्तीचा मनुष्य आहे. कश्यप नांदे काही महिन्यामध्ये मरणार आहे, ज्याची त्याला अजिबात काळजी नाहीये. देवयानीमुळे कश्यप राधाच्या आयुष्यात येणार आहे.”
दोन विविध लुक्समधले सचित पाटील आपल्याला पाहायला मिळणार असून मालिकेत नेमकं काय नाट्य घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहात राहा, ‘राधा प्रेम रंगी रंगली’ कलर्स मराठीवर रात्री 9.30 वा.