नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ सिनेमाने मराठी सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आणि एक नवा पायंडा घातला. या सिनेमाने संपूर्ण बॉलिवूडला भुरळ घातली त्यामुळे या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक करण्याचा मोह कोण कसा आवरेल. प्रसिध्द दिग्दर्शक करण जोहर यांनी ‘सैराट’चा अधिकृत रिमेक ‘धडक’ तयार केला आहे.
मराठी प्रेक्षक कुठेतरी नकळत आपल्या ‘सैराट’ची तुलना ‘धडक’सोबत करू लागला आहे. जेव्हा पहिल्यांदा धडकचा ट्रेलर आणि गाणं प्रदर्शित झालं, तेव्हा त्यातील आर्ची आणि परश्या साकारणा-या जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरची तुलना रिंकू आणि आकाशसोबत होऊ लागली. मराठीचा अधिकृत रिमेक असल्याने धडकमधील प्रत्येक सीन हा बहुतांशी ‘सैराट’साऱखाच असणार आहे. पण तरीही आपण तुलना करतोय. नाही हा परशासारखा नाही वाटत किंवा ही आर्चीसारखी डॅशिंग नाही.
गाण्यांच्याबाबतीत तर यापेक्षाही जास्तच तुलना कारण ‘सैराट’च्या गाण्यांना संगीतबध्द करून अजरामर करणारे अजय-अतुल या संगीतकार जोडगोळीनेच ‘धडक’च्या गाण्यांना संगीत दिलं आहे. त्यामुळे या ‘धडक’ च्या गाण्यांची चालसुध्दा ‘सैराट’प्रमाणेच असणार. पण ते हिंदी गाण्याचे शब्द जरी कानावर पडले तरी आपण मराठी ‘सैराट’चं गाणं आपसूकच गाऊ लागतो.
हिंदी सिनेमा आणि मराठी सिनेमा यात नेहमीच फरक असतो. दोन्ही सिनेमांचे बजेट, कलाकार, लोकेशन, सेट्स यात खुप तफावत असते. पण कितीही समजावलं तरी कुठेतरी प्रेक्षक नकळत का होईना आपल्या लोकप्रिय व सुपरहिट ‘सैराट’ची तुलना ‘धडक’सोबत करणारच, हे मात्र नक्की.