सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या अभिनयावर महाराष्ट्रासोबतच संपूर्ण देश फिदा आहे. रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या सिद्धार्थ जाधवचं एक नवं रुप प्रेक्षकांना ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या मंचावर पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिद्धार्थने अनेक कलाकारांसोबत मंचावर धिंगाणा घातलाय.
भन्नाट टास्क आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत आता होऊ दे धिंगाणा कार्यक्रमाला महाराष्ट्राचा नंबर वन कार्यक्रम बनवला. ३१ डिसेंबरच्या विशेष भागात सिद्धार्थ गायकाच्या रुपात प्रेक्षकांना नव्या वर्षाची अनोखी भेट देणार आहे.
या नव्या प्रयोगाविषयी सांगताना सिद्धार्थ म्हणाला, 'माझ्यासाठी हे वर्ष खऱ्या अर्थाने धिंगाणामय झालंय. संपूर्ण महाराष्ट्र आता होऊ दे धिंगाणा कार्यक्रमावर भरभरुन प्रेम करत आहे. या वर्षाचा शेवट आणि नव्या वर्षाची सुरुवात धिंगाणामय करण्यासाठी ३१ डिसेंबरच्या विशेष भागात मी आनंद शिंदेंचं एक सुपरहिट गाणं सादर करणार आहे. माझ्यासाठी हा अतिशय भन्नाट अनुभव होता. गाण्याची आवड मला आहेच. या विशेष भागाच्या निमित्ताने एक वेगळा प्रयोग करण्याची संधी मिळाली आहे. माझ्यासोबत सुनील बर्वे, मधुराणी गोखले प्रभुलकर, शशांक केतकर, आशा शेलार, ज्ञानदा रामतीर्थकर यांच्या गाण्यांची सुरेल मेजवानी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. तेव्हा ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला रात्री ९ ते ११ पाहायला विसरु नका आता होऊ दे धिंगाणा फक्त स्टार प्रवाहवर.