रितेश-जिनिलिया या महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीचा वेड हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालतोय. सगळ्यांनाच ह्या सिनेमाने अक्षरश: वेड लावलंय. वेड’चे यश आणि तुझे मेरी कसम ते वेड या सिनेमांपर्यंत मनोरंजन कारकिर्दीची २० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रितेशला आपला मित्र दिग्दर्शक निशिकांत कामतची आठवण आली आणि काही क्षणांसाठी तो भावूक झाला. आज निशिकांत असता तर ‘वेड’चे दिग्दर्शन त्यानेच केले असते, असेही रितेशने यावेळी सांगितले. मी फक्त पोस्टरवर अभिनेता म्हणूनच झळकलो असतो. लय भारी हा सिनेमा आम्ही एकत्र केला होता. आमची खुप छान टीम होती. पुढेसुध्दा फिल्मसाठी आम्ही एकत्रच येणार होतो. पण त्या बॉलिवूड सिनेमाचं काम काही कारणास्तव पूर्णत्वास गेलं नाही. जिनिलियानंसुध्दा निशिकांतसोबत फोर्समध्ये काम केलं आहे.
‘वेड’ या चित्रपटाने प्रदर्शनापासून चार दिवसांतच कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. ‘वेड’ने आतापर्यंत तिकीटबारीवर १३ कोटींहून अधिक कमाई केली असून मराठी चित्रपटांसाठी नव्या वर्षाची सुरुवात दमदार झाल्याची भावना चित्रपटसृष्टीत व्यक्त होते आहे.