'वाळवी' या मराठी सिनेमाने 2023 या नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात केली, हा थ्रिलर-कॉमेडी प्रेक्षकांना प्रचंड भावतोय. अजूनही लोक सिनेमागृहात परेश मोकाशी दिग्दर्शित आणि मधुगंधा कुलकर्णी लिखित हा सिनेमा पाहतायत. पहिल्यांदाच अशा प्रकारचा जबरदस्त अनुभव घेतल्याच्या भावना प्रेक्षकांच्या होत्या आणि त्यांनीच सिनेमाची प्रसिध्दी करत हा सिनेमा डोक्यावर घेतला. 'वाळवी'ने अभूतपूर्व यश मिळवल्याने या सिनेमाची संपूर्ण टीम खुपच आनंदात आहे.
नुकतंच 'वाळवी'चं यश साजरं करण्यासाठी परेश मोकाशी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधच एक छोटेखानी पार्टी आयोजित करण्यात आली होती. अभिनेत्री शिल्पा तुळस्करने ही पार्टी 'वाळवी'च्या टीमसाठी आयोजित केली होती. परेश मोकाशींचा ह्यावेळी वाढदिवस साजरा करण्यात आल्यानंतर या टीमने एक महत्त्वाची घोषणा केली.
मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी आणि झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी यांनी या पार्टीत लवकरच 'वाळवी 2' घेऊन येतोय अशी घोषणा केली. त्यामुळे सगळ्यांच्याच उत्साहाला उधाण आलं. या सिक्वलमध्ये पहिल्या भागापेक्षा अधिक ट्विस्ट आणि सस्पेन्स असणार ह्याची ग्वाही परेश मोकाशी यांनी दिली आहे. पण नेहमीप्रमाणेच त्यांनी या सिक्वलबाबत आणखी माहिती गुपीतच ठेवलीय.
‘वाळवी’ हा मराठीतील पहिला ब्लॅक कॉमेडी चित्रपट आहे. याआधी मराठीत असे प्रयोग फार क्वचित झाले आहेत. ‘झी स्टुडिओ’ आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी मिळून केलेल्या ‘वाळवी २’ च्या घोषणेमुळे सगळेच मराठी प्रेक्षक आता याची आतुरतेने वाट पाहणार आहेत. या चित्रपटात स्वप्नील जोशी, शिवानी सुर्वे, सुबोध भावे आणि अनीता दाते यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता संपूर्ण महाराष्ट्राला 'वाळवी 2' चे वेध लागले आहेत.