तुम्हाला हे वाचून नक्कीच असं वाटलं असेल की, ऋषिकेश जोशीने नवं घर घेतलं असावं पण असं अजिबात नाही. आज अनेक अभिनेते दिग्दर्शन क्षेत्रात वळत आहेत. ऋषिकेश जोशी असाच एक हरहुन्नरी अभिनेता लवकरच दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतोय. त्याचा ‘होम स्वीट होम’ हा दिग्दर्शनातील पदार्पणाचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
या सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच एका हटके अंदाजात समोर आला. सुंदर घराचे एक पोस्टर आणि घरावरची सुंदर कविता अशा पध्दतीने हा लूक सादर करण्यात आला. तसंच या सिनेमाच्या टीझरमध्ये वैभव जोशी यांची कविता आणि त्यांचा आवाज वापरण्यात आला आहे.
‘होम स्वीट होम’ या सिनेमाचं विशेष म्हणजे दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांची शेवटची भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. यासोबतच मोहन जोशी, स्पृहा जोशी आणि ऋषिकेश जोशी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
प्रत्येकाला आपल्या घराबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर असतो. मग ते घर कसंही असो लहान किंवा मोठं प्रत्येकाला ते जीवापाड प्रिय असतं. काहीचं तर घर घेण्याचं मोठं स्वप्नं असतं. अशीच घराभोवती गुंफलेली नाविन्यपूर्ण कथा असलेला ‘होम स्वीट होम’ हा सिनेमाचा गृहप्रवेश म्हणजेच प्रदर्शन येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण माहाराष्ट्रात होत आहे.