अनेक दिवसांपासून तेलगु अभिनेता आणि राजकीय व्यक्तिमत्त्व एनटीआर यांच्या जीवनावर आधारित एक सिनेमा तयार होत असल्याची घोषणा झाली होती. या सिनेमात आंध्रप्रदेशच्या या कर्तुत्ववान मुख्यमंत्र्याचा राजकीय प्रवास उलगडण्यात येणार आहे. या सिनेमात त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत विद्या बालन दिसणार असल्याची चर्चा आहे. तसंच या भूमिकेसाठी ती हार्मोनियमसुध्दा शिकत असल्याचे बोलले जात आहे. आता य़ा सिनेमात आणखी एक नाव जोडलं जात आहे.
एनटीआर यांच्या या जीवनपटात अभिनेत्री श्रीदेवी यांच्या भूमिकेसाठी सोनाक्षी सिन्हा, राकुल प्रीत आणि श्रध्दा कपूर यांच्या नावाची चर्चा रंगली होती. पण इंग्रजी वृत्तपत्र मिड डेच्या वृत्तानुसार श्रीदेवींच्या भूमिकेसाठी राकुल प्रीतच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. हा खुपच लहान सीन असणार असून राकुलसुध्दा श्रीदेवींची ही भूमिका साकारण्यासाठी खुप उत्सुक आहे. फक्त आता राकुलच्या इतर सिनेमांच्या तारखा आणि एनटीआरच्या सिनेमांच्या तारखांचं वेळापत्रक जुळवणं फक्त बाकी आहे.
सिनेमाचे निर्माते विष्णू इंदूरी याबाबत सांगतात, “या जीवनपटात श्रीदेवींची व्यक्तिरेखा फार लहान असली तरी श्रीदेवींच्या करिअरला शिखरावर पोहचवण्यात एनटीआर याचं महत्त्वाचं योगदान होतं. दोघांनी जवळपास 14 सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. श्रीदेवींच्या उल्लेखाशिवाय हा सिनेमा अधुरा वाटेल. श्रीजींच्या या भूमिकेसाठी राकुलच आमची पहिली पसंती होती.”
लोकप्रिय अभिनेता आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री अशी एनटीआर यांची ओळख आहे. एनटीआर यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य आजही सिनेसृष्टी आणि सक्रिय राजकारणात आहेत. एनटीआर यांनी साकारलेल्या धार्मिक व्यक्तिरेखांमुळे ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले. एनटीआर यांनी अनेक पौराणिक व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत केल्या. 50 च्या दशकांत एनटीआर यांनी साकारलेले राम आणि श्रीकृष्ण प्रेक्षकांना खुपच भावले.