'बोगदा' या आशयघन सिनेमाचे सोशल नेट्वर्किंग साईटवर 'झुंबड' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आधारित असलेले हे गाणे, प्रेक्षकांना आपल्या शब्दांनी आणि तालात मंत्रमुग्ध करणारे आहे. मंदार चोळकर लिखित 'झुंबड' या गाण्याचे संगीत दिग्दर्शन सिद्धार्थ शंकर महादेवन आणि सौमील श्रींगारपुरे या दुकलीने केले असून, सिद्धार्थ शंकर महादेवनचा सुमधुर आवाज या गाण्याला लाभला आहे. बोगदा चित्रपटातील हे गाणे प्रेक्षकांना दर्जेदार संगीताची आणि नृत्याची अनुभूती देणारे ठरणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=8pk3qIp5tEY&authuser=0
'झुंबड' या गाण्यांचा प्रभाव जितका प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आहे, अगदी तितकाच प्रभाव हे गाणे तयार करताना आणि साकारताना झाला होता. या गाण्याला स्वरबध्द करताना सिद्धार्थ महादेवन इतका मनमोहून गेला होता की, 'झुंबड' च्या तालावर त्यानेच भर स्टुडीयोत ठेका धरला होता. इतकेच नव्हे तर, सेटवरील सर्व कलाकारांनादेखील या गाण्याने संमोहित केले होते. 'झुंबड' या गाण्याच्या चित्रीकरणासाठी दोन दिवस लागणार होते. जेव्हा त्याचे शुटींग सुरु झाले तेव्हा, या गाण्याच्या नशेत धुंद असलेल्या सेटवरील सर्व कलाकारांनी पहिल्याच दिवशी ते पूर्ण चित्रित करून टाकले होते. विशेष म्हणजे, नृत्यदिग्दर्शिका दिपाली विचारे हिच्या तालावर मृण्मयीनेदेखील ठेका धरत, टीमला पुरेपूर साथ दिली होती.
मायलेकीच्या नात्यामधील विविध पैलू मांडणाऱ्या या सिनेमाचे पटकथा आणि संवादलेखन दिग्दर्शिका निशिता केणी यांनीच केले असून, करण कोंडे, सुरेश पानमंद, नंदा पानमंद यांबरोबर त्यांनी निर्मात्यांची धुरादेखील सांभाळली आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.