बॉलिवूड लव्हबर्ड्स दिपीका पादुकोण आणि रणवीर सिंहच्या लगीनघाईबद्दल तर आपण सर्वच जाणतो. इटलीमध्ये पार पडणा-या या शुभमंगल सावधानची संपूर्ण बॉलिवूडसह चाहत्यांनासुध्दा प्रचंड उत्सुकता आहे. दोघांचीसुध्दा या ड्रीम वेडींगसाठी जोरदार तयारी सुरू आहे. या शानदार सोहळ्यात फक्त 30 पाहुण्यांची उपस्थिती असणार आहे. पण या बॅंण्ड बाजा बारातबाबतची एक महत्त्वाची बातमी बाहेर आली आहे.
डीएनए वृत्तपत्राच्या बातमीनुसार, या खासगी लग्नसोहळ्यात दिपीका-रणवीर यांनी पाहुण्यांना मोबाईल फोन आणि कॅमे-याशिवाय येण्याची विनंती केली आहे. अभिनेत्री सोनम कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नावरुन धडा घेत हा निर्णय त्यांनी घेतला असल्याचे बोलले जात आहे. लग्नातील खास क्षणाचे फोटो बाहेर व्हायरल होऊ नये, यासाठी ही दक्षता घेण्यात येत आहे.
इटलीमध्ये हा शानदार विवाहसोहळा पार पडणार असून ज्यात फक्त खास 30 नातेवाईक आणि मित्रपरिवाराचा समावेश असेल, तर मुंबईत ग्रॅंण्ड रिसेप्शन आयोजित करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. या खास पाहुण्यांमध्ये रणवीरचा खास मित्र अभिनेता अर्जुन कपूर आणि दिपीकाचा मित्र शाहरूख खान यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
मध्यंतरी एका मुलाखती दरम्यान दिपीकाला लग्न करण्यासंदर्भात विचार स्पष्ट करण्यास सांगण्यात आले होते, तेव्हा ती म्हणाली, “मी नक्कीच लग्न करणार आहे. तसंच मला आई होण्याचीसुध्दा इच्छा आहे. मी माझ्या आई-वडिलांना आदर्श जोडी मानते. आयुष्यातील अनेक सख-दुख:च्या प्रसंगांना ते एकत्र सामोरे जातात. ते फक्त नातंच सांभाळत नाहीत, तर त्यांच्यात आजही तितकंच प्रेम आहे, मलासुध्दा तसंच नातं सांभाळायचं आहे.”
काही दिवसांपूर्वीच रणवीर-दिपीका या बॉलिवूड लव्ह-बर्ड्सना फ्लोरिडा येथे सिक्रेट व्हेकेशन साजरे करतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. रणवीर सिंह सध्या ‘सिम्बा’ सिनेमाची शुटींग पूर्ण करण्याची तयारी करतोय. त्याने नुकतंच नवीन घर खरेदी केलं असून त्याच्या घराच्या सजावटीचं काम सुरु आहे. लग्नानंतर दिपीका आणि रणवीर येथेच राहणार असल्याची चर्चा आहे.