By  
on  

तीन पिढ्यांचं मनोरंजन करणारं चित्रा सिनेमागृह काळाच्या पडद्याआड जाणार

दादरच्या मध्यवर्ती भागात असलेलं आणि गेली ३६ वर्ष सिनेप्रेमींचं मनोरंजन करत असलेलं चित्रा सिनेमागृह हे लवकरच बंद होणार आहे. खिशाला परवडणारं सिनेमाचं तिकीट आणि मराठी सिनेमांच्या शो साठी हे सिनेमागृह प्रसिद्ध होतं. अभिनेता टायगर श्रॉफचा अलीकडेच प्रदर्शित झालेला सिनेमा ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ हा या सिनेमागृहात दाखवण्यात येणार शेवटचा चित्रपट ठरणार आहे. एका आघाडीच्या वृत्तपत्राला मिळालेल्या माहितीनुसार आज गुरुवारी या सिनेमाचा शेवटचा खेळ या सिनेमागृहात दाखवला जाणार आहे.

१९८३ साली प्रदर्शित झालेला अभिनेता जॅकी श्रॉफचा ‘हिरो’ हा सिनेमा त्यावेळेस प्रचंड गाजला होता. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रा सिनेमागृहाजवळ प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी या सिनेमागृहात या सिनेमाचे हाऊसफुल शो सुरु होते. विशेष योगायोग म्हणजे जॅकी श्रॉफचा सिनेमा ज्या सिनेमागृहात सुपरहिट ठरला, त्याच जॅकी श्रॉफच्या मुलाचा म्हणजेच टायगर श्रॉफच्या सिनेमाचा आज शेवटचा शो येथे होणार आहे. 'दे धक्का', 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय', 'बालगंधर्व', 'टाईमपास' यांसारखे अनेक मराठी सिनेमे पाहायला प्रेक्षकांनी या सिनेमागृहात गर्दी केली होती.

गेली ३६ वर्ष या सिनेमागृहाचं व्यवस्थापन पी.डी मेहता यांचा मुलगा दारा मेहता याने सांभाळलं. “१९६१ साली प्रदर्शित झालेला शम्मी कपूर यांचा ‘जंगली’ हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाने या सिनेमागृहाचे तब्बल २५ आठवडे गाजविले होते. त्याकाळी या सिनेमागृहाकडे मराठी प्रेक्षक वर्गाचा ओघ जास्त होता''. अशी आठवण त्यांनी या सिनेमागृहाबद्दल सांगितली. परंतु प्रेक्षकांचा अल्पप्रतिसाद आणि आर्थिक चणचण जाणवत असल्यामुळे हे सिनेमागृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात व्यवस्थापनाने संगनमताने घेतला आहे

Recommended

PeepingMoon Exclusive