सिनेमातील आई म्हटलं कि अनेक चेहरे डोळ्यासमोरुन तरळून जातात. एक चेहरा मात्र रसिकांच्या सदैव लक्षात आहे तो म्हणजे रिमा लागू यांचा. अवघ्या सिनेसृष्टीत रिमाताई म्हणून ओळखल्या जाणा-या रिमा लागू यांचा आज द्वीतीय स्मृतीदिन. एरवी भारतीय सिनेमाने पडद्यावर मुलांसाठी अपार कष्ट करणारी, त्याग करणारी आई दाखवली होती. पण रिमा लागू यांच्या रुपाने आईचं सोज्वळ पण ग्लॅमरस रुप प्रेक्षकांसमोर आलं.
रिमा अगदी लहानपणापासूनच अभिनयाशी जोडल्या गेल्या होत्या. लहानपणी बेबी नयन या नावाने त्यांनी अभिनय साकारला. शिक्षणानंतर मराठी नाटकं आणि मग सिनेमे अशी मजल दरमजल करत त्यांनी आपल्या अभिनय क्षमतेची दखल घेण्यास भाग पाडलं. ‘झाले मोकळे आकाश’, ‘तो एक क्षण’, ‘पुरुष’, ‘बुलंद’, ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकांमधील त्यांच्या अदाकारीला विशेष नावाजलं गेलं.
जवळपास ऐंशीचं दशक हिंदी सिनेमाही अधिकाधिक ग्लॅमरस होत होता. त्यावेळी कयामत से कयामत तक, मैंने प्यार किया, हम आपके है कौन या सिनेमांनी रिमा यांची ओळख बॉलिवूडला झाली. ‘वास्तव’मधील तत्वनिष्ठ पण मायाळू आई किंवा ‘कल हो ना हो’मधली संयमी आई साकारावी तर रिमा यांनीच. रेशीमगाठ सिनेमासाठी त्यांना राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिला गेला. रिमा यांनी हिंदी मालिकेतही कामाचा ठसा उमटवला. श्रीमान श्रीमती, तू तू मै मै या मालिकेतील त्यांच्या व्यक्तिरेखेने मनात घर केलं. अशा या चतुरस्त्र अभिनेत्रीला पीपिंगमूनची भावपुर्ण श्रद्धांजली.