बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या मराठी निर्मितीतला पहिला सिनेमा ‘व्हेंटिलेटर’चा गुजराती रिमेक लवकरच येतोय. मराठीनंतर गुजराती प्रेक्षकांवर जादू करण्यासाठी हा सिनेमा आता सज्ज झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे या सिनेमात जग्गू दादा प्रमुख भूमिकेत झळकतोय.
मानाचे राष्ट्रीय पुरस्कार ‘व्हेंटिलेटर’ने पटकावले होते. यात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, संकलन आणि ऑडिओग्राफी या पुरस्कारांचा समावेश आहे. राजेश म्हापुसकरने मराठी ‘व्हेंटिलेटर’च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती आता, गुजराती रिमेकचे दिग्दर्शन उमंग व्यास करणार आहेत. मराठीत आशुतोष गोवारीकर यांनी साकारलेली भूमिका जॅकी श्रॉफ गुजरातीत साकारणार आहेत. लवकरच प्रदर्शित होणा-या या गुजराती ‘व्हेंटिलेटर’च्या ट्रेलरची जग्गू दादाला प्रचंड उत्सुकता आहे. जग्गूदादाने सिनेमाचे पोस्टर शेअर करत सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता आपल्याला असल्याचे ट्विटरच्या माध्यातून चाहत्यांना सांगितले आहे.
https://twitter.com/bindasbhidu/status/1030025704610512896
नात्यांची अफलातून गुंफण असलेल्या गुजराती 'व्हेंटिलेटर' रिमेकची कथा निरेन भट्ट यांनी लिहली असून मराठीसारखंच यश या सिनेमाला मिळावे, अशी अपेक्षा प्रियंकाच्या पर्पल पेबल पिक्चर्सकडून व्यक्त करण्यात येत आहे.
बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा झेंडा फडकावणा-या प्रियंकाच्या पर्पल पेबल पिक्चर्सची निर्मिती असलेला आणखी एक नवीन मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘फायरब्रॅण्ड’ असं या सिनेमाचे नाव असून सध्या या सिनेमाचे चित्रीकरण सुरू आहे.