By  
on  

महात्मा फुलेंचं आयुष्य 'सत्यशोधक' सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर दिसणार

मराठी सिनेविश्वात अनेक महान व्यक्तींच्या आयुष्यावर सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेले आहेत. 'बालगंधर्व', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'मी सिंधुताई सपकाळ' यांसारख्या अनेक सिनेमांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. स्त्री शिक्षणासाठी आणि समाजकार्यासाठी ज्यांनी स्वतःचं आयुष्य वेचलं अशा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची संघर्षगाथा लवकरच रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

आपल्या प्रभावी अभिनयाने प्रसिद्ध असलेले संदीप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे या सिनेमात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. अलीकडेच राजश्री देशपांडेची 'सेक्रेड गेम्स' या वेबसिरीजमध्ये दिसली होती. तीच्या भूमिकेला सर्वांनी दाद दिली. तसेच संदीप कुलकर्णींची 'सिटी ऑफ ड्रिम्स' या वेबसिरीजमधील भूमिका सगळीकडे चर्चेत आहे.

'सत्यशोधक' सिनेमाविषयी संदीप कुलकर्णी म्हणाले, ''महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याचे विचार काळापुढचे होते. तसंच त्यांचं नातंही काळाच्या पुढेच होतं. त्यांच्यातल्या नात्याचा वेध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात येणार आहे. त्यामुळे या दांपत्याचे पुरोगामी विचार, त्यांचं कार्य, त्यांचं नातं हे सर्वांपर्यंत पोहोचण्याचा आमचा उद्देश आहे.''

'सत्यशोधक' या सिनेमाची निर्मिती 'समता प्रॉडक्शन' आणि 'कथाकार एंटरटेन्मेंटनं' केली आहे. नीलेश जळमकर हे या सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक आहेत. या सिनेमाचं ५० टक्के चित्रीकरण पूर्ण झालं आहे. २०१९च्या अखेरीस हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Recommended

PeepingMoon Exclusive