बिग बींच्या मराठी सिनेमाच्या शूटिंगला आजपासून सुरुवात
'बदला' सिनेमा यशस्वी झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्याकडे सध्या अनेक सिनेमांच्या ऑफर्स आल्या आहेत. अमिताभ बच्चन मिलिंद लेले दिग्दर्शित 'एबी अँड सीडी' या मराठी सिनेमात सुद्धा झळकणार आहेत. या सिनेमाच्या शूटिंगला आजपासून सुरुवात होणार आहे. या सिनेमात विक्रम गोखले यांची अमिताभ बच्चन यांच्या सोबत महत्वाची भूमिका असणार आहे.
या सिनेमाच्या हटके नावाबद्दल निर्माते अक्षय बर्दापूरकर म्हणाले,''एबी म्हणजे अर्थात अमिताभ बच्चन आणि सीडी म्हणजे चंद्रकांत देशमुख. अभिनेते विक्रम गोखले हे चंद्रकांत देशमुख ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. अमिताभ हे ख-या आयुष्याप्रमाणे सत्तरी गाठलेला एक सुपरस्टार साकारत आहेत. विक्रमजी जी व्यक्तिरेखा साकारत आहेत त्यांचं कुटुंब त्यांच्या ७५व्या वाढदिवसाला काहीतरी वेगळं करण्याची योजना आखत असतात आणि या निमित्ताने एबी आणि सीडी या दोन जुन्या मित्रांची अचानक गाठ घालून देऊन त्यांना अविस्मरणीय भेट घालून देण्याचा कुटुंबियांचा प्रयत्न असतो. असं या सिनेमाचं कथानक आहे.''
यापुढे निर्माते अक्षय म्हणाले,''जूनच्या पहिल्या आठवड्यात या सिनेमाच्या शूटिंगचा पहिला टप्पा पुण्यात पार पडेल. पुढे जुलैच्या मध्यापर्यंत सिनेमाचं शूटिंग संपवून या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.''
या सिनेमाद्वारे बिग बी आणि विक्रम गोखले या दोन दिग्गज कलाकारांचा अभिनय पाहणं ही प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.