By  
on  

‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाच्या शूटिंगला आजपासून उत्साहात सुरुवात

आधुनिक काळात कथा सांगण्याच्या पद्धतीत बदल होत गेले आहेत. नव्या दमाच्या लेखक आणि दिग्दर्शकासह जबाबदार चित्रपट निर्मात्यांनी आपल्या ‘मीडियम स्पाइसी’ या नव्या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात केली आहे. अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात पहिला क्लॅप खुद्द लेखिका इरावती कर्णिक यांच्या हस्ते दिल्याने ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाच्या शूटिंगची हटके सुरुवात झाली आहे.

'लॅन्डमार्क फिल्म्स' प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’ या सिनेमाची निर्मिती विधि कासलीवाल यांनी केली आहे. ‘मीडियम स्पाइसी’ हा सिनेमा अनेक बाबींमध्ये युनिक आहे. इरावती कर्णिक यांच्या लेखणीतून आलेली कथा सुद्धा एका अनोख्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. चित्रपटाचा विषय इरावती यांच्या अतिशय जवळचा असून या कथेशी त्यांची भावनिक नाळ जुळलेली आहे. इरावती यांनी यापूर्वी ‘गाशा’, ‘तीच ती दिवाळी’, ‘पैसा वसूल’, ‘बाळकडू’, ‘मृगाचा पाऊस’ आदी एकांकिकाचे तर ‘एक राधा एक मीरा’, ‘परी हूँ मै’, ‘आनंदी गोपाळ’ अशा चित्रपटाचे लेखन केले आहे. तसेच इरावती कर्णिक यांना भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचा ‘युवा पुरस्कार’ मिळाला आहे.

 

या सिनेमाबद्दल बोलताना इरावती कर्णिक म्हणाल्या, “मीडियम स्पाइसी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा पहिला क्लॅप देणे हा मी माझा सन्मान समजते. हा माझ्यासाठी अत्यंत स्पेशल सिनेमा आहे. सुरुवातीला सांगायचे तर ही कथा दिग्दर्शक मोहितच्या व्यक्तिगत अनुभवांवर आधारीत आहे आणि मग माझा या सिनेमाच्या गोष्टीमध्ये प्रवेश झाला. पुढे मी या चित्रपटाची पटकथा लिहिली. पटकथा लिहीत असताना मी त्यातील गहनता व हळूवारपणा जपण्याचा प्रयत्न केला आहे. मी स्वतःला या कथेसाठी झोकून दिले होते हे सर्व जरी रोमांचक असले तरी पटकथेवर काम करणे आव्हान असते. मात्र पूर्णत्वास गेलेली ही कथेला जेव्हा दिग्दर्शक, निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ आणि संपूर्ण टीम मूर्त रूप देतात तेव्हा ते पाहणे खूप सुखावह आहे. यामुळे हा पहिला क्लॅप देऊन चित्रपट पुढच्या टप्प्यावर नेणे हा माझ्यासाठी एक पवित्र विधी पार पाडल्यासारखे आहे”.

लेखिका इरावती कर्णिक आणि मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करणारे नाटककार मोहित टाकळकर यांच्या डोक्यातून मूर्त रुपात आलेली ही ‘मीडियम स्पाइसी’ कथा नेमकी काय आहे याच्या उत्तरासाठी प्रेक्षकांना काही काळ वाट पहावी लागणार आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर, पर्ण पेठे आणि अभिनेता ललित प्रभाकर अशी जबरदस्त स्टारकास्ट आहे. तसेच बहुआयामी दिग्दर्शक मोहित टाकळकर आणि प्रतिभाशाली लेखिका इरावती कर्णिक यांना निर्मात्या विधि कासलीवाल यांची लाभलेली भक्कम साथ यामुळे प्रेक्षकांच्या मनात ‘मीडियम स्पाइसी’ चित्रपटाबद्दल उत्कंठा निर्माण झालेली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive