लोकसभा निवडणुकीच्या निकालांची रणधुमाळी सध्या सगळीकडे जोरात सुरु आहे. कुठे कोणी हरतंय तर कुठे कोणी उमेदवार विजयाचा आनंद साजरा करत आहे. या निवडणुकीच्या रिंगणात हिंदी तसेच मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारसुद्धा सामील आहेत. यातील एक महत्वाचं नाव म्हणजे डॉ. अमोल कोल्हे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार अमोल कोल्हे यांनी शिरूर मतदारसंघामधून विजयी झाले आहेत.
अमोल कोल्हे हे शिवसेना पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. आणि राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून त्यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात पाऊल ठेवले. आज लोकसभेचे निकाल हळूहळू बाहेर पडत आहे. शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे यांच्याविरुद्ध शिवसेना पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील उभे आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमोल कोल्हे यांनी या मतदारसंघात ४,७७,९१८ हजार मतांनी विजयी झाले आहेत.
अमोल कोल्हे यांची 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अमोल कोल्हे यांनी अभिनयासोबतच निवडणुकीच्या रिंगणात सुद्धा बाजी मारली आहे. या विजयाचे श्रेय अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आणि सर्वेसर्वा शरद पवार यांना दिले. तसेच त्यांनी शिरूर मतदारसंघातील मतदारांचे आभार मानले.