''शरद पवार यांची भूमिका साकारायला आवडेल'', सुबोध भावे
बायोपिक आणि सुबोध भावे हे एक समीकरण आहे. सुबोधने आतापर्यंत बालगंधर्व, लोकमान्य टिळक, काशिनाथ घाणेकर या चरित्र भूमिका पडद्यावर उत्तमपणे रंगवल्या. येत्या काही दिवसांमध्ये सुबोध भावे थोर आणि ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांच्या भूमिकेत दिसला तर आश्चर्य वाटायला नको.
प्राध्यापक वसंत कानेटकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाशिक येथे झालेल्या एका कार्यक्रमात सुबोधची मुलाखत घेण्यात आली.
https://www.instagram.com/p/Bx6bFunhvJO/
या मुलाखतीच्या वेळेस सुबोध भावेला आता कोणाचा बायोपिक करायला आवडेल हा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना सुबोध म्हणाला,''मनात काय चाललंय हे तुम्हाला काहीच कळू द्यायचं नाही. हे फार अवघड आहे. शरद पवार ५५ वर्ष राजकारणात आहेत. त्यांनी जेवढं बघितलंय तेवढं आज राजकारणात कोणीच पाहिलेलं नाही. मी चेष्टा म्हणून म्हणत नाही, पण सतत सातत्यानं व्यक्त होणाऱ्या नेत्यांपेक्षा एक नेता जो योग्य ठिकाणी योग्य वेळ येताच व्यक्त होतो, अशा नेत्याची भूमिका करायला मला नक्कीच आवडेल,''
सुबोध हा सध्या 'तुला पाहते रे' या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. तसेच 'अश्रूंची झाली फुले' या नाटकात सुबोध लाल्याची भूमिका साकारत आहे. तसेच सुबोध सध्या अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले या दिग्गज अभिनेत्यांसोबत 'एबी अँड सीडी' या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे.