Birthday Special : प्रत्येक भुमिका समरसून साकारणारे सर्वांचे लाडके अशोकमामा
अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील 'हम पांच' सारख्या मालिकेमध्येही त्यांनी अभिनय केला. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे एक मराठी सुपरस्टार आहेत.
मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ' ययाती आणि देवयानी ' या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या.
गजानन जागीरदार यांच्या 'दोन्ही घरचा पाहुणा' या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली. त्यानंतर दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार'मधील इरसाल पोलीस, 'राम राम गंगाराम'मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या. मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अशोक सराफ यांचा नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी या त्रिस्थळी काम सुरू आहे आणि प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळविले आहेत.
अशोक सराफ यांनी सिनेसृष्टीसोबतच रंगभुमीसुद्धा स्वतःच्या अभिनयाने गाजवली. 'हमीदाबाईची कोठी', 'अनधिकृत', 'मनोमिलन', 'सारखं छातीत दुखतंय' इ. त्यांची नाटकं रंगभुमीवर लोकप्रिय झाली. अमेरिकेतील सिएटल येथे 2007 साली झालेल्या बृहन्महाराष्ट्र कन्व्हेन्शन येथे विजय केंकरे दिग्दर्शित 'हे राम कार्डिओग्राम' या नाटकाद्वारे त्यांनी परदेशी रंगमंचावरही पाऊल ठेवले आहे.
अशोक सराफ हे नाव घेतलं की आजही त्यांचे 'अशीही बनवाबनवी', भुताचा भाऊ, 'धुमधडाका', 'एक डाव धोबीपछाड', 'गम्मत जम्मत', 'माझा पती करोडपती', 'सगळीकडे बोंबाबोंब', 'घनचक्कर', 'नवरा माझा नवसाचा' आदी सिनेमांमधल्या भुमिका हमखास आठवतात. या सिनेमांना प्रदर्शित होऊन इतकी वर्ष लोटली तरी आजही धनंजय माने, दादा दांडगे, कंडक्टर, पोलीस अधिकारी यांसारख्या भुमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
फार मोजक्या मराठी अभिनेत्यांनी हिंदी सिनेसृष्टीतसुद्धा आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यात अशोक सराफ यांचं नाव आदराने घ्यावं लागेल. आज अशोकमामांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे तरी आजही त्यांची काम करण्याची अफाट ऊर्जा सर्वांना थक्क करते. सध्या त्याचं 'व्हॅक्युम क्लीनर' हे नाटक रंगभुमीवर सुरु आहे.
सर्वांच्या या लाडक्या मामांना आणि आपल्या अभिनयाने भारतीय सिनेसृष्टी गाजवणा-या या अभिनेत्याला पिपिंगमुन मराठीतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!