By  
on  

Trailer Out : इच्छा मरणावर भाष्य करणारा 'बोगदा'

'बोगदा' या सिनेमाच्या शीर्षकावरून, प्रेक्षकांकडून या सिनेमाबाबत अनेक तर्कवितर्क केले जात होते. मात्र, मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या सिनेमाच्या ट्रेलर लॉंच कार्यक्रमात, या सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे. नितीन केणी प्रस्तुत 'बोगदा' या सिनेमाचा ट्रेलर 'इच्छा मरण' या विषयावर भाष्य करतो. आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित असलेला हा सिनेमा दर्जेदार कलाकृतीचा उत्तम नमुना असल्याची जाणीव, सिनेमाचा ट्रेलर पाहताना होते.

https://www.youtube.com/watch?v=pJe2htAYUx8&authuser=0

ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांनी साकारलेली आजारी आई आणि गुणी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने साकारलेली लेक या दोन प्रमुख व्यक्तिरेखांच्या नातेसंबंधावर हा सिनेमा बेतला आहे. तसेच, अभिनेता रोहित कोकाटेचीदेखील यात महत्वपूर्ण भूमिका असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आई आणि मुलीच्या नात्यातील भावनिक ऋणानुबंध जपणारा 'बोगदा' सिनेमाचा ट्रेलर पाहून प्रेक्षक आपसूकच, सिनेमाच्या आशयात गुंतून जातो.

आईचे आजारपण आणि स्वतःच्या महत्वाकांक्षा यामध्ये गुरफटलेल्या एका गरीब सामान्य मुलीची कथा यात आहे. तसेच, आजाराला कंटाळून आपल्या मुलीकडे मरणाची केविलवाणी मागणी करणारी 'आई' देखील यात आपल्याला दिसून येते आहे. जन्म आणि मृत्यू या जीवनातील दोन अटळ घटकांवर या सिनेमाचा ट्रेलर भाष्य करतो. आईच्या इच्छेखातर तिला स्वेच्छामरण देण्याचा कठीण विचार एखादी मुलगी करू शकेल का? हा बाका प्रश्न 'बोगदा' सिनेमाच्या ट्रेलरमुळे उपस्थित होतो.

'इच्छा मरण' या मुद्द्यावर समाजात अनेक वैचारिक मतभेद असून, खऱ्या आयुष्यात अशक्यप्राय असलेला हा मुद्दा 'बोगदा' सिनेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे. त्यामुळे, या सिनेमात नेमके काय पाहायला मिळणार आहे?  ही उत्सुकता सिनेप्रेक्षकांना स्वाभाविक आहे.

येत्या 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या 'बोगदा'  या सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन निशिता केणी यांनी केले असून, करण कोंडे, सुरेश पानमंद, नंदा पानमंद यांसोबत त्यांनी सिनेमाच्या निर्मितीची धुरादेखील सांभाळली आहे. या

सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना वैचारिक आणि भावनिक दृष्टीकोन प्रदान करत असल्यामुळे, 'बोगदा' सिनेमा पाहण्याची सर्वत्र उत्सुकता लागली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive