By  
on  

नि:स्वार्थ मैत्रीवरचा रिफ्रेशिंग सिनेमा 'दोस्तीगिरी' !

शाळा आणि महाविद्यालयातली मैत्री ही नि:स्वार्थ, निरागस, आणि निखळ असते. कॉलेजच्या कट्ट्यावर भेटलेली जीवाभावाची मित्रमंडळी प्रत्येकाच्याच हृदयात एक खास स्थान मिळवून असतात. ह्या सुंदर नात्यावरचा ‘दोस्तीगिरी’ हा सिनेमा येत्या 24 ऑगस्टला सिनेमागृहात झळकतो आहे. या सिनेमाची नुकतीच पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

‘दोस्तीगिरी’ सिनेमाच्या पत्रकार परिषदेत सिनेमाचे दिग्दर्शक विजय शिंदे, ह्यांच्यासह संकेत पाठक, राहुल राज डोंगरे, पुजा मळेकर, विजय गीते, पुजा जयस्वाल आणि अक्षय वाघमारे हे कलाकार उपस्थित होते.

सिनेमाचे दिग्दर्शक विजय शिंदे सांगतात, "दोस्तीगिरी पाच जिवलग मित्र-मैत्रिणींची कथा आहे. मनोज वाडकर यांनी आजच्या कॉलेज युवकांच्याच भाषेत सिनेमाचे संवाद लिहिल्याने सिनेमा खूपच मनोरंजक झाला आहे. सिनेमाचे निर्माते कैलासवासी संतोष पानकर यांनी हा सिनेमा घेऊन यायचे स्वप्न तीन वर्षांपूर्वी पाहिले होते. पण दुर्देवाने त्यांचा एक महिन्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला. त्यांचे स्वप्न आता 24 ऑगस्टला पूर्णत्वास येत असल्याचे समाधान आहे."

अभिनेता संकेत पाठक सिनेमाविषयी बोलताना सांगतो, “आम्ही सर्वांनीच हा सिनेमा प्रेक्षकांसमोर येण्यासाठी कसून मेहनत केली आहे. मी या सिनेमात सॅम ही भूमिका साकारतोय आणि योगायोगाने माझे वडिलही मला प्रेमाने सॅम हाक मारायचे. त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी खूप खास आहे. या सिनेमाद्वारेच मी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. त्यामुळे या सिनेमाला प्रेक्षकांचा काय प्रतिसाद मिळतोय, हे जाणून घ्यायला मी खुप उत्सूक आहे. ”

“मी युवापिढीविषयक असणा-या अनेक सिनेमांतून काम केले. पण दोस्तीगिरी खूप वेगळा सिनेमा आहे. या सिनेमाच्या सेटवर मला जीवाभावाचे मित्रमैत्रिण मिळाले, आमची सेटवर झालेली खरीखुरी बॉन्डिंगच तुम्हांला सिनेमातून पाहायला मिळणार आहे.", असे अभिनेता अक्षय वाघमारे सांगतो.

अभिनेत्री पूजा जयस्वाल म्हणते, “प्रत्येकासाठीच आपल्या कॉलेजमधली मैत्री खूप खास असते. सिनेमा पाहताना तुम्हांला आपल्या कॉलेजचीच आठवण होईल. मैत्रीच्या नात्यातले वेगवेगळे कंगोरे तुम्हांला या सिनेमात पाहायला मिळतील.”

विजय गीते सांगतो, “मैत्रीच्या अल्लड, खोडकर नात्याविषयीचा सिनेमा असला तरीही पाच मित्रांच्या दोस्तीची वाटचाल तुम्हांला सिनेमात दिसेल आणि ही स्वत:चीच कथा पाहत असल्याची तुम्हांला जाणीव होईल."

अभिनेत्री पूजा मळेकर म्हणते,”दोस्तीगिरी सिनेमाच्या चित्रीकरणावेळीच मला जीवाभावाचे दोस्त मिळाले. जेवढी दोस्ती घट्ट, तेवढी मस्ती जास्त... हाच आमच्याही दोस्तीचा नियम आहे. आमची हीच दोस्ती आणि त्यातली मस्ती तुम्हांला मोठ्या पडद्यावरही 24 ऑगस्टला पाहता येईल. “

https://www.youtube.com/watch?v=gDjMnGlrSGk&authuser=0

संतोष पानकर निर्मित, विजय शिंदे दिग्दर्शित दोस्तीगिरी सिनेमात संकेत पाठक, अक्षय वाघमारे, विजय गिते, पुजा मळेकर, पुजा जयस्वाल हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील. 'अरिहंत मुव्हिज क्रिएशन्स' प्रस्तूत 'मोरया मुव्हिज क्रिएशन्स' निर्मित "दोस्तीगिरी" या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद मनोज वाडकर यांनी लिहीले आहेत. रोहन-रोहन यांचे संगीत असलेला "दोस्तीगिरी" सिनेमा येत्या 24 ऑगस्ट 2018 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive