कौन बनेगा करोडपतीद्वारे या कार्यक्रमाद्वारे छोटा पडदासुध्दा गाजवणारे शहनशाह अमिताभ बच्चन लवकरच याचा 10 वा सीझन घेऊन येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या बॉलिवूडच्या महानायकाचा आवाज घराघरात घुमणार आहे. या कार्यक्रमाचं शुटींग सुरू झालं असून महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या एका भागात थोर समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे उपस्थितीत राहणार आहेत.
विविध कठीण-सोप्या प्रश्नांमुळे बुध्दीला चालना देण्याबरोबरच पैसे जिंकण्याची संधी केबीसी या कार्यक्रमामुळे मिळते. अनेक सामान्यांचं करोडपती-लखपती बनण्याचं स्वप्न या कार्यक्रमामुळे पूर्ण झालं. लहान-थोरांसह संपूर्ण कुटुंबाबरोबर या कार्यक्रमाचा आनंद आपण इतकी वर्षे घेत आहोत.
https://twitter.com/drvikasamte/status/1032112831641071621
हॉटसीटवर बसण्याचा मान डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांना मिळतानाचा भाग लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. याबाबत अमिताभ यांनी ट्विट करुन म्हटलं आहे, “डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे या दोन दिग्गज समाजसेवकांसोबत केबीसीचा हा भाग शुटींग करणं हा माझ्यासाठी खरंच एक सन्मान आहे. प्रेरणादायी असणा-या त्यांच्या अफाट समाजकार्याची आपण कधी कल्पनाही केली नसेल.”
कौन बनेगा करोडपतीचा हा विशेष भाग येत्या 7 सप्टेंबर 2018 रोजी प्रसारीत होणार आहे. हा भाग नक्की पाहण्याबाबतचं ट्विटसुध्दा डॉ. प्रकाश आमटे यांनी केलं आहे.