मोगरा फुलला
दिग्दर्शक: श्राबणी देवधर
कलाकार: स्वप्नील जोशी, सई देवधर, नीना कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, आनंद इंगळे
वेळ: 2 तास 15 मिनीट
रेटींग : 3 मून
‘मोगरा फुलला’ या सिनेमाची चर्चा निर्मितीपुर्वी पासूनच होती. श्राबनी देवधर यांचा बऱ्याच वर्षांनी आलेला सिनेमा म्हणूनही या सिनेमाकडे पाहिलं जात होतं. अभिनेता स्वप्नील जोशीही नेहमीपेक्षा हटके भूमिकेत दिसला आहे. आई आणि मुलाच्या हळव्या नात्याची गोष्ट आजवर अनेक सिनेमांमधुन प्रेक्षकांना पहायला मिळाली आहे. परंतु तरीही वेगळ्या मांडणीमुळे आणि कलाकारांच्या सुंदर अभिनयामुळे या मोग-याचा दरवळ दिर्घकाळ स्मरमात राहतो.
कथानक:
सुनिल कुलकर्णी(स्वप्नील जोशी) हा आईवर(नीना कुलकर्णी) प्रेम करणारा आणि तीच्या आज्ञेत असणारा मुलगा. पेशाने साॅफ्टवेअर इंजिनीअर असलेला सुनील आईच्या शब्दाबाहेर नाही. आईचं सुद्धा सुनीलवर नितांत प्रेम असतं. परंतु आपल्या मातृत्वाच्या प्रेमामध्ये ती सुनिलला कुठेतरी बांधुन ठेवते. अगदी सुनीलसारखी आज्ञाधारक सुन मिळावी याची तीला अपेक्षा असते. आईच्या अपेक्षेला साजेशी सुन न मिळाल्याने सुनील आईच्या सांगण्यावरुन आतापर्यंत 38 मुलींना नकार दिला आहे. कालांतराने सुनील ज्या बँकेसाठी साॅफ्टवेअरचे काम पाहत असतो त्या बँकेच्या व्यवस्थापिका शिवानी गुप्तेच्या(सई देवधर)प्रेमात पडतो. शिवानीला पाच-सहा वर्षांची लहान मुलगी आहे. अशावेळेस आईच्या आज्ञेत असणा-या सुनीलचं हे नातं आई स्वीकारेल का? आणि शिवानी आणि सुनीलचं नातं पुढे कोणत्या वळणावर जाईल? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना हा सिनेमा पाहुन मिळतील.
दिग्दर्शन:
श्राबणी देवधर यांनी खुप वर्षानंतर 'मोगरा फुलला' तर्फे दिग्दर्शनात पाऊल टाकले आहे. त्यांच्या आजवरच्या सिनेमापेक्षा 'मोगरा फुलला'ला एकदम फ्रेश टच त्यांनी दिला आहे. पटकथा थोडी पसरट असली तरी त्यांनी सिनेमावरची आपली पकड सुटु न देता सुंदर आणि हळुवार प्रसंगांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या सिनेमातली गाणी आणि संगीत या सिनेमाचं बलस्थान आहे. तरुणाईचा आघाडीचा संगीतकार रोहीत राऊतने कथेच्या गरजेनुसार या सिनेमाला श्रवणीय संगीत दिलं आहे. 'मारवा', 'मोगरा फुलला' ही गाणी पुन्हा पुन्हा ऐकावी इतकी लाजवाब झाली आहेत.
अभिनय:
या सिनेमातील भुमिकांसाठी कलाकारांची केलेली निवड ही या सिनेमातली आणखी एक जमेची बाजु म्हणता येईल. प्रथमतद स्वप्नील जोशीचा उल्लेख करायलाच हवा. सुनीलच्या काहीश्या वेगळ्या भुमिकेत स्वप्नील संपुर्ण सिनेमात स्वतःच्या अभिनयाची छाप पाडतो. सुरुवातीला काहीसा वेंधळा असणारा सुनील नंतर मात्र आत्मविश्वासु होतो. सुनिलच्या व्यक्तिमत्वातले हे दोन कंगोरे स्वप्नीलने आपल्या अभिनयातुन उत्तमरित्या साकारले आहेत. नीना कुलकर्णी यांनी सुद्धा आईची भुमिका सहज अभिनयाने सुंदर वठवली आहे. सई देवधरचं या सिनेमाच्या निमित्ताने मराठीत पुनःपदार्पण झालं. सईनेही शिवानीची तगमग योग्यरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे. संदिप पाठक, चंद्रकांत कुलकर्णी, आनंद इंगळे आदी कलाकारांनी सुद्धा आपापल्या भुमिकांमध्ये चोख अभिनय केला आहे. छोट्या छोट्या भुमिकांमध्ये कसलेले कलाकार असल्याने अभिनयाच्या बाबतीत हा सिनेमा उजवा ठरतो.
सिनेमा का पहावा:
तसेच जर तुम्ही स्वप्नील जोशीचे चाहते असाल, तर स्वप्नीलची ही वेगळी भुमिका तुम्हाला त्याच्या प्रेमात पाडल्याशिवाय राहणार नाही. ज्या प्रेक्षकांना सुंदर प्रेमकहाणीला हळुवार गाण्यांची जोड असणारे सिनेमे आवडत असतील त्यांनी आवर्जुन हा सिनेमा पहावा.