ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनानंतर संपूर्ण मराठी सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली. सर्वांनाच या हरहुन्नरी अभिनेत्याचे जाणे मनाला चटका लावून गेले. अनेक मराठी सेलिब्रिटींनी त्यांची आठवण म्हणून त्यांचे जुने फोटो आणि विजूमामा तुमच्या जाण्याने आम्ही पोरके झालो, अशाप्रकारच्या पोस्ट सोशल मिडीयावर पोस्ट करत भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. परंतु या दरम्यान एका सोशल मिडीया पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधूनच घेतले नाही, तर एका नव्या वादाला तोंड फुटले.
लेखक-दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी विजय चव्हाण यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करण्याऐवजी सोशल मिडीयावर एक खोचक आणि वादग्रस्त प्रश्न केला, तो म्हणजे “मराठी रंगभूमीवरील, सर्वचजण तुमचे मामा किंवा मावशी कसे असतात. जर त्यांच्या जाण्याने तुम्हाला इतकं दु:खंच होत असेल, तर तुमच्यापैकी कोण कोण ते आजारी असताना भेटायला गेले होते?"
सचिन कुंडलकरांच्या या खोचक प्रश्नावर आता मराठी सिनेसृष्टीतून सेलिब्रिटींच्या विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अभिनेते आणि शिवसेनेचे चित्रपटसेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर एका वृत्तपत्राला प्रतिक्रिया देताना म्हणाले, “मला या विषयावर बोलायचं नव्हतं, पण आता राहवत नाही म्हणून बोलतो. जेव्हा उध्दव ठाकरेंना विजय चव्हाण यांच्या आजारपणाचे वृत्त समजताच त्यांनी त्वरित मला वैयक्तिक पातळीवर आणि पक्षाच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्यास सांगितली. त्यांना मुलुंड येथील फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांची मी भेट घेतली होती. तसंच त्यांना श्वसनाचा त्रास असल्याने एक ऑक्सीजन मशीन, ज्याची किंमत अडीच लाख रुपये आहे ते दिले होते. मला याबद्दल काहीच बोलायचं नव्हतं.पण कुंडलकरांनी वस्तुस्थिती न समजुन घेता किंवा याबाबतची कोणतीही सविस्तर व पूर्ण माहिती जाणून न घेता अशाप्रकारचा आरोप करणं, हे फारंच खेदजनक आहे.”
तर गुणी अभिनेता जितेंद्र जोशी कुंडलकरांच्या या सोशल मिडीया पोस्टवर संतापला असून त्यानेसुध्दा प्रत्युत्तर म्हणून तशीच खोचक पोस्ट करत कुंडलकरांचा चांगलाच समाचार घेतला आहे. जितू म्हणतो, “सचिन कुंडलकर, क़ाय कमाल लिहिता हो तुम्ही पण गंमत अशी की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असे म्हणतात परंतु ती संधी तुम्ही आम्हाला देउच्च शकत नाही कारण विजय चव्हाण यांना आम्ही ‘मामा’ म्हटलेलं तुम्हाला चालत नाही परंतु सुमित्रा भावेंना तुम्ही एकेरी नावाने हाक न मारता ‘मावशी’ म्हणता आणि महेश एलकुंचवारांचा उल्लेख महेश’दा’ असा करता . बरं कसंय ना कि हे आम्हाला लहानपणापासून शिकवलंय आमच्या घरच्यांनी ज्याला आम्ही संस्कार असं म्हणतो त्यानुसार आमच्या घरी कामाला येणाऱ्या बाईला सुद्धा मावशी आणि रिक्शा टॅक्सी वाल्या वयस्कर गृहस्थाला अत्यंत सहजतेने काका/मामा म्हणतो आणि हे कुणीतरी बळजबरी केली म्हणून नव्हे तर तसा भाव आमच्या मनात प्रकट होतो आपोआप.”
शेअर केली आहे. त्याने विजय चव्हाण यांच्या निधनाच्या वृत्तानंतर मराठी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींवर कुंडलकरांनी दिलेली प्रतिक्रिया किती निंदनीय आहे, हे या पोस्टवरुन त्याने दाखवून दिलं आहे.