By  
on  

आदिनाथ कोठारेने बनावट फेसबुक प्रोफाईलप्रकरणी केली सायबर तक्रार

सायबर गुन्हेगारीची प्रकरणे ही जगभर घडत असतात आणि त्यांचे स्वरूप हे अत्यंत गंभीर असते. आपल्या देशातही या घटना अगदी सर्वसामान्य ते मान्यवरांच्या बाबतीत घडत असतात. आपले बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टी त्याला अपवाद नाहीत. सायबर घोटाळा असो, सायबर फसवणूक असो की एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्याची चुकीची ओळख दाखवून केलेली फसवणूक असो, या गोष्टी सतत घडत असतात.

या सायबर गुन्हेगारीचे अलीकडचे प्रकरण घडले आहे ते,प्रख्यात मराठी अभिनेता आदिनाथ कोठारेच्या बाबतीत. आघाडीचे अभिनेते आणि निर्माते महेश कोठारे यांचा पुत्र असलेल्या आदिनाथ याने याबाबतीत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीने एक बोगस फेसबुक अकाऊंट आदिनाथच्या नावाने उघडून त्याचा खोटा इमेल आयडीसुद्धा निर्माण केला होता. त्या माध्यमातून या गुन्हेगाराने त्याचे मित्र आणि परिचितांशी संपर्क प्रस्थापित केला, आणि त्यांना फसविण्याचा प्रयत्न केला. त्याने आदिनाथ आणि त्याच्या कुटुंबाची छायाचित्रेही या अकाऊंटवर टाकली आहेत, असेही या तक्रारीत म्हटले आहे.

सायबर सेलने या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून आदिनाथच्या तक्रारीनंतर तपासही सुरु केला आहे. कांदिवली पूर्व येथील समता नगर पोलिसांनी हा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम ४१९ आणि ५०० अंतर्गत (फ़सवणूक आणि बदनामी) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६- सी व ६६-डी (खोटी ओळख दाखवून संगणकाच्या माध्यमातून फसवणूक) अंतर्गत नोंदविला गेला आहे.

दरम्यान महत्त्वाचं म्हणजे याच सायबर गुन्हेगारीवर भाष्य करणारा व आदिनाथची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला टेक केअर गुड नाईट हा मराठी सिनेमा येत्या 31 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive