बी-टाऊनमधील स्टार किडमध्ये आराध्या बच्चनचं नाव नेहमीच कुठे ना कुठे चर्चेत असतं. अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन यांची मुलगी आणि बिग बींची लाडकी नात आराध्याबद्दल प्रसिध्दी माध्यमांमधून काही ना काही नेहमीच ऐकायला मिळतं. कधी आईबरोबर तिने कान्स महोत्सवाला लावलेली हजेरी असो किंवा नेटक-यांनी तिच्यावरुन अभिषेकला मारलेला टोमणा असो. पण यावेळेस आराध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाचा 10 वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीझनची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. पण महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या लॉंच दरम्यान प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना अमिताभ यांनी आपल्याला लाडकी नात आराध्यासोबत केबीसी खेळायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
अमिताभ पुढे सांगतात, “आराध्या सध्या खुप लहान आहे. पण तिला माहितीय की केबीसी नावाचा एक कार्यक्रम मी करतो आहे. तिला या कार्यक्रमाची सिग्नेचर ट्यूनपण खुप आवडते. परंतु बुध्दीला चालना देणा-या हा कार्यक्रम समजून घेण्यासाठी तिचं वय अजून कमी आहे. ती तिच्या शाळेतील अनेक उपक्रमांमध्ये नेहमीच व्यस्त असते. तसंच तिच्या वयाच्या क्विझ कॉम्पिटीशनमध्येसुध्दा ती नेहमी भाग घेते. अभ्यासात तर ती अग्रेसर आहेच.”
तर तुम्ही कधी हॉट सीटवर बसाल का असं बिग बिंना विचारल्यावर ते हसून म्हणतात, “मी तर 2-3 प्रश्नांमध्येच आऊट होईन.”