शिर्षक वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना, कोण परत येत आहे, कोणाची नवीन आता चर्चा सुरू होतेय.....तोच तो जो तुम्हाला खळखळून हसवतो. ऑफिसमधून कंटाळून आणि थकून-भागून आल्यावर टेन्शनवर मात करण्यासाठी तो नेहमी मदत करतो. त्याचा कार्यक्रम पाहिला की टेन्शन की बजाओ..असंच म्हणतो आपण. लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वचजण त्याचा कार्यक्रम मनमुराद एन्जॉय करतात. आपल्या अफलातून आणि अचूक विनोदांमुळे प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा कपिल शर्मा परत येतोय.
हो.... तुम्ही जे ऐकलं आहे, ते खरंय. कपिल पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. कॉमेडीचा बादशाह कपिलचा द कपिल शर्मा शो पुन्हा सुरू होणार आहे. त्याच्या या कार्यक्रमातून त्याने फक्त आजपर्यंत प्रेक्षकांनाच नाही तर कार्यक्रमात पाहुणे म्हणून आलेल्या सेलिब्रिटींनासुध्दा पोट धरुन हसायला लावलं.
मध्यंतरी कपिल अनेक चढउतारांना सामोरं गेला. कधी त्याच्या बंगल्याचा वाद तर कधी त्याचं ट्विटरवरील बेताल वक्तव्य असो. फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा हा शो देखील तीन भागांनंतर बंद पडला होता. प्रसिध्दी माध्यमांसोबतसुध्दा त्याचं बरेचदा वाजलं. पण आता कपिल पुन्हा उभा राहतोय. त्याच्या चाहत्यांसाठी. तसंच चाहत्यांच्या प्रेमापोटी त्याला लवकरात लवकर आपला कार्यक्रम घेऊन परतायचं आहे.
चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींनासुध्दा लाडक्या कपिलच्या कार्यक्रमाची प्रचंड आतुरता आहे.