By  
on  

पाहा Photos : संजय दत्तच्या उपस्थितीत पार पडला ‘बाबा’ सिनेमाचा ट्रेलर लाँच

संजय दत्त प्रॉड्क्शनची निर्मिती असलेल्या बाबा सिनेमाची चर्चा पोस्टर रिलीज झाल्यापासूनच सुरु होती. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचं खुमासदार शैलीत अभिजीत खांडकेकरने सुत्रसंचालन केलं होतं.

यावेळी सिनेमात मुख्य भूमिकेत असलेले दीपक डोब्रियाल म्हणतात, माझं 12 वर्षांचं काम एकीकडे आणि या सिनेमाचा अनुभव एकीकडे आहे. या सिनेमाच्या अनुभवामुळे अभिनेता म्हणून पुर्नजन्म झाल्यासारखा वाटत आहे. दीपक यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. आजवर त्यांनी अनेक हिंदी सिनेमात अभिनयाचा ठसा उमटवला आहे. या सिनेमाच्या निर्मितीची धुरा मान्यता दत्त यांच्या संजय दत्त प्रॉडक्शनने सांभाळली आहे. मान्यताचा निर्माती म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. निर्मितीसाठी मराठी सिनेमाचीच निवड का केली हे विचारलं असता ती म्हणते, प्रादेशिक भाषेतील सिनेमांची आशयघनता उत्तम असते. मराठी सिनेमात चकचकाट फार नसला तरी विषय आणि मांडणी उत्तम असते. त्यामुळेच मी या सिनेमाशी जोडले गेले आहे याचा मला आनंद आहे.


 

संजय दत्तची या सोहळ्यास असलेली उपस्थिती लक्षणीय ठरली. त्याने अनेक प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं दिली. निर्मितीसाठी ‘बाबा’ या सिनेमाचीच निवड का केली असं विचारलं असता तो म्हणतो, ‘या नावाने मला आकर्षित केलं. या नावाशी भावनिकदृष्ट्या अ‍ॅटॅच आहे. शिवाय मी एक मराठी माणूस आहे. माझ्या शाळेतील शिक्षिकाही मराठी होत्या. तसेच माझी आई देखील महाराष्ट्रीयन होती. त्याशिवाय या सिनेमाच्या निर्मितीचं सगळं श्रेय टीमला आहेच. बाकी माझ्याकडून आणि माझ्या टीमचा मुख्य उर्जास्त्रोत (मान्यताकडे पाहात) हा आहे. माझ्या आयुष्याचा देखील हाच आहे.’

या सिनेमात दीपक डोब्रियाल, नंदिता पाटकर, चित्तरंजन गिरी, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर आणि बालकलाकर आर्यन मेंघजी यांच्या भूमिका आहेत. 'बाबा' हा सिनेमा २ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive