‘सविता दामोदर पराजंपे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाची कथा शरद आणि कुसुम या दांपत्याभोवती फिरते. शरदचे कुसुमवर नितांत प्रेम असते, कुसुमच्या आयुष्यात अचानक चमत्कारिक आणि भीतीदायक घटना घडू लागतात. त्यामुळे त्यांच्या जीवनाला वेगळे वळण मिळतं. काही काळानंतर यामागील गूढ आणखी वाढत जाते. या घटनांमुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर येतो. या दांपत्याचा संसार कोण उद्ध्वस्त करु पाहत आहे? यापासून त्यांचा बचाव कोण करतो? हे दाम्पत्य या घटनांना कसे सामोरे जाते? एकामागोमाग घडणाऱ्या घटनांची उकल करण्यात या दाम्पत्याला यश मिळतं का? या साऱ्या प्रश्नांची उत्तर आपणाला पडद्यावर पहायला मिळतील.
मंदार चोळकर व वैभव जोशी लिखित या चित्रपटातील गीतांना निलेश मोहरीर आणि अमित राज यांचं सुश्राव्य संगीत लाभले आहे. ‘जादुगरी’, ‘श्री स्वामी समर्थ, ‘किती सावरावा’, ‘वेल्हाळा’ अशी वेगवेगळ्या पठडीतली चार गीते या चित्रपटात असून स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, जान्हवी प्रभू–अरोरा, निशा उपाध्याय-कापाडिया या गायकांच्या सुरेल आवाजात ही गीते स्वरबद्ध झाली आहेत.
या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता जॉन अब्राहम आणि अनेक यशस्वी हिंदी सिनेमांची निर्मीती व वितरण करणारे ‘पॅनोरमा स्टुडिओज’चे कुमार मंगत पाठक यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. ‘जे.ए.एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते असून सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. उत्तम संहितेसोबत संगीत व गाण्याचा वेगळा बाज या सिनेमातून अनुभवायला मिळणार आहे.
सिनेमाची कथा शेखर ताम्हाणे यांची असून लेखन व संवाद शिरीष लाटकर यांचे आहेत. योगेंद्र मोगरे, तृप्ती मधुकर तोरडमल सहनिर्माते आहेत. छायांकन प्रसाद भेंडे तर संकलन क्षितिजा खंडागळे यांचे आहे. कलादिग्दर्शन संतोष फुटाणे, ध्वनी संयोजन प्रणाम पानसरे यांचे आहे.
‘सविता दामोदर पराजंपे’ येत्या 31 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.