‘यू अँड मी’ या नव्या व्हिडीओ अल्बमसाठी रसिका आणि अदिती एकत्र आल्या आहेत.आपल्या हटके अंदाजात कटकारस्थानं करत धमाल उडवून देणाऱ्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील शनाया आणि ईशा यांचा दोस्ताना सर्वश्रुत आहेच. आपला दोस्ताना कायम ठेवत पुन्हा एकदा बदमाशियां करण्यासाठी या दोघी सज्ज झाल्या आहेत. फक्त आता त्यांचा हा दोस्ताना येऊ घातलेल्या ‘यू अँड मी’ या नव्या व्हिडीओ अल्बमसाठी आहे.
जरा सा कट्टा टाकू आता... जरासी बाते तेढीमेढी...
थोडासा किस्सा करू आता... थोडीशी यादे तेरी मेरी...
करू आम्ही मनमानिया... ऐसी है अपनी यारीया...
असं म्हणत रसिका सुनील आणि आदिती द्रविड, आपला दोस्ताना या अल्बमधून सांगत आहेत. या दोघींचा ‘यू अँड मी’ हा नवाकोरा अल्बम लवकरच प्रदर्शित होत असून व्हिडिओ पॅलेसने या अल्बमची निर्मिती केली आहे.
या गाण्याची खासियत म्हणजे स्वत: आदिती द्रविड हिने हे गाणं लिहिलं असून आदिती आणि रसिकानेच हे गाणं गायलं आहे. या अल्बमच्या निमित्ताने रसिकाच्या गायकीची नवी ओळख प्रेक्षकांना होणार आहे. साई–पियुष यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. फुलवा खामकर हिने या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. लोणावळा येथे चित्रित झालेल्या या एका गाण्यासाठी रसिका आणि आदिती यांनी 12 वेगवेगळे ड्रेस परिधान केले आहेत.
अभिनयात चुणूक दाखवल्यानंतर रसिका आणि आदितीच्या संगीताचे सूर प्रेक्षकांच्या पंसतीस उतरतील का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.