मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा गुणी आणि हरहुन्नरी अभिनेता सुमित रागवन याला आपल्यासमोर एका नवीन व्यक्तिरेखेत दिसणार आहे. मह्त्त्वाचं म्हणजे ही व्यक्तिरेखा दुसरी तिसरी कोणाची नसून रंगभूमी आणि सिनेसृष्टी गाजवणाया नटश्रेष्ठ डॉ.श्रीराम लागूंची आहे. मोठ्या पडद्यावर डॉ. लागूंची ही व्यक्तिरेखा प्रथमच साकारण्यात येणार आहे, ती म्हणजे आगामी सिनेमा ‘आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर’ या सिनेमाच्या निमित्ताने. ही भूमिका साकारण्याचं आव्हान पेलण्यास सुमीत राघवन सज्ज झाला आहे.
सुमीतनेच आपल्या या आगामी मह्त्त्वकांक्षी भूमिकेबद्दल सोशल मिडीयाच्या माध्यमातून माहिती दिली. सुमीत पोस्टमध्ये लिहतो, “एवढ्या मोठ्या माणसाचे जीवन साकारणे म्हणजे तारेवरची कसरत होती. शूटींगच्या आधी डॉ.लागूंचे आशीर्वाद मिळाले हे माझं भाग्यच म्हटलं पाहिजे. निखिल साने आणि माझा दिग्दर्शक अभिजीत देशपांडेचेसुध्दा मनापासून आभार कारण त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. प्रचंड उत्सुकता आणि तितकीच धाकधूक होतेय.. कुठेही उथळ किंवा त्यांची नक्कल माझ्याकडून होता कामा नये ह्याची पूर्ण दक्षता बाळगली आहे.”
“भेदक नजर,शांत पण काळजाच्या आरपार जाणारा आवाज. स्थितप्रज्ञ, मराठी रंगभूमीचे अनभिषिक्त नटसम्राट!डॉ. श्रीराम लागू 'आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर' 7 नोव्हेंबर 2018”, असं म्हणत सुमीतने या पोस्ट सोबतच डॉ. लागूंसोबतच्या भेटीचे काही फोटोसुध्दा शेअर केले आहेत.
सा-यांनाच सुमीतच्या या सिनेमातील डॉ. लागूंच्या व्यक्तिरेखेत पाहण्याची आतुरता लागून राहिली आहे.