By  
on  

संजय दत्त आणि माधुरी दिक्षीत तब्बल 21 वर्षानंतर दिसणार एकत्र

अभिनेता संजय दत्त आणि सौंदर्यवती अभिनेत्री माधुरी दिक्षीत यांनी आपल्या सिनेमांमधून बॉलिवूडचा 80- 90 चा काळ गाजवला हे आपण सर्वच जाणतो. पण यात अधोरेखित करण्यासारखं म्हणजे यांच्या सिनेमांपेक्षा या दोघांच्या प्रेमप्रकरणाची गरमा-गरम चर्चा तेव्हा बरीच रंगली होती. पण काळानुसार त्यांच्या प्रेमप्रकरणावर पडदा पडला. महत्त्वाची बाब म्हणजे हे बॉलिवूडचे जुने लव्हबर्ड्स लवकरच एका आगामी सिनेमानिमित्त एकत्र येत आहेत.

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, संजय दत्त आणि अभिनेत्री माधुरी दिक्षीत तब्बल 21 वर्षांनंतर करण जोहरचा सिनेमा ‘कलंक’निमित्ताने एकत्र झळकणार आहेत. हे दोघंही सिनेमाचा फक्त एक भाग असल्याच्या पूर्वी चर्चा होत्या, परंतु नुकतंच मुंबई मिररच्या वृत्तानुसार संजय आणि माधुरीने एकत्र सीन शूट केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता वरुण धवन यांच्यासोबतच संजय व माधुरीने सलग तीन दिवस एका महत्त्वपूर्ण सीनचं शूट पूर्ण केलं. आता फक्त माधुरीचं एकच शूट शेड्यूल्ड आहे, ज्यात ती मुजरा करणार असून याचं नृत्यदिग्दर्शन प्रसिध्द नृत्यदिग्दर्शिका सरोज खान आणि रेमो डिसूझा करणार आहेत.

संजय दत्त आणि माधुरी दिक्षीतच्या त्यांच्या जमान्यापासून ते आत्तापर्यंतच्या सर्वच लहान-मोठ्या चाहत्यांना एकत्र पाहण्याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. करण जोहरच्या या आगामी ‘कलंक’मध्ये संजय आणि माधुरीसोबतच आलिया भट्ट, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर आणि कियारा अडवाणी अशी भलीमोठी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. ‘कलंक’ हा आगामी सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच 2019 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive