ऋतिक रोशनचा आगामी सिनेमा ‘सुपर 30’ चा फर्स्ट लूक शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर उलगडला आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या सिनेमाचा फर्स्ट लूक पोस्टर खुद्द ऋतिकनेच ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. आयआयटीचे कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांचा हा जीवनपट असून ऋतिक ‘सुपर 30’ सिनेमात आनंद यांची भूमिका साकरतोय.
‘सुपर 30’च्या या पोस्टरवर अब राजा का बेटा राजा नही बनेगा, असं लिहलं आहे. तसेच पोस्टरवरील ऋतिकच्या फोटोवर अनेक गणिताचे फॉर्म्यूले रेखाटण्यात आल्याचे पाहायला मिळतायत. त्यामुळे सर्वांनाच या सिनेमाची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.
https://twitter.com/iHrithik/status/1037043022767288321
दरम्यान, आनंद कुमार यांच्या ख-या आयुष्यात एक रंजक वळण आल्याने या सिनेमाचं चित्रीकरणसुध्दा काही दिवस थांबलं होतं, अशी माहिती आहे. ‘सुपर 30’ मध्ये गरीब मुलांना शिकविण्यात येत नसल्याचा आरोप आनंद यांच्यावर करण्यात येत होता. सूत्रांच्या माहितीनुसार यानंतर आनंद कुमारसुध्दा बेपत्ता झाले होते आणि अद्याप त्यांचा कोणताच ठावठिकाणा लागला नसल्याचे समजते.
म्हणूनच या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर ‘सुपर 30’ मधील ऋतिकची कहाणी कशी मोठ्या पडद्यावर साकारण्यात येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे, परंतु अद्याप याबाबत पोस्टरवर कोणताच उलगडा झालेला नाही.