लवकरच रुपेरी पडद्यावर साकारणार ‘तुझं माझं अरेंज मॅरेज’

By  
on  

सध्या मराठी सिनेसृष्टीत प्रेम, लग्न, प्रेमविवाह अशा अनेक विषयांवर आधारित सिनेमे एकापाठोपाठ येत आहेत. विविध धाटणीचे या विषयांवरचे हे सिनेमे पाहायला मिळत आहेत. या सिनेमांच्या भाऊ गर्दीत अरेंज मॅरेजकडे लक्ष वेधणारा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अरेंज मॅरेजचं मनोरंजक पद्धतीने चित्रण 'तुझं माझं अॅरेज मॅरेज' या सिनेमातून केलं जाणार आहे.
प्रेम, प्रेमविवाह यांच्या पलीकडे जाऊन अरेंज मॅरेजमध्ये असलेली गंमत उलगडण्याचा प्रयत्न या सिनेमातून केला जाणार आहे. अरेंज मॅरेजच्या निमित्ताने दोन कुटुबं, वेगवेगळ्या स्वभावाची, विचारांची माणसं एकत्र येतात. त्यातून बरीच धम्माल घडते. लग्नातले विधी, त्यावेळी होणारी गडबड हे नाट्यमय असतं. हा सगळा प्रकार मनोरंजक पद्धतीने पहायला मिळणार आहे.

अरेंज मॅरेजचा विषय अतिशय धमाल आणि मनोरंजक पद्धतीने या सिनेमातून मांडला जाणार आहे. दिनेश शिरोडे या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. सिनेमाची कथा-गीतलेखन मयूर परदेशी, छायांकन सुनील बोरकर यांचे आहे. प्रतिक-प्रथमेश यांचे संगीत दिग्दर्शन असून गायक अवधूत गुप्ते यांच्या सुमधुर आवाजात सिनेमाची गाणी स्वरबध्द करण्यात आली आहेत तर कला दिग्दर्शन नितेश नांदगावकर यांचं आहे.

षष्ठीज फिल्म अँड एंटरटेन्मेंटचे अमित ललित तिळवणकर आणि अमोल कागणे फिल्म्सचे लक्ष्मण कागणे हे या सिनेमाची निर्मिती करत आहेत. अमोल कागणे फिल्म्सच्या लक्ष्मण कागणे यांनी अनेक महोत्सवांमध्ये गौरवलेल्या 'हलाल' या सिनेमांची निर्मिती केली होती. तसंच 'लेथ जोशी', 'परफ्युम' या सिनेमांचे ते प्रस्तुतकर्ते आहेत. ‘तुझं माझं अरेंज मॅरेज’ हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे, असं निर्माते अमोल लक्ष्मण कागणे यांनी सांगितलं.

'तुझं माझं अरेंज मॅरेज' या सिनेमातील कलाकारांचा अद्याप उलगडा झाला नसल्याने सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Recommended

Loading...
Share