मराठी सिनेमांची परदेशवारी ही काही नवी गोष्ट नाही, पण महाराष्ट्रात प्रदर्शित होऊन प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवत लगेच अमेरिकेतील सिनेमागृहात झळकण्याचा मान ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाने मिळवला आहे. शुक्रवारी 31 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा येत्या शुक्रवारी 7 सप्टेंबर रोजी अमेरिकेतील सिनेमागृहात झळकणार आहे. ऑस्टीन, शिकागो, लॉस एंजिलस, वॉशिंग्टन, सॅन फ्रान्सिस्को, अटलांटा, सिएटेल, डॅलस, पोर्टलॅण्ड, सॅक्रामेंटो, एडिसन या शहरांतील सिनेमागृहात ‘सविता दामोदर परांजपे’ प्रदर्शित होणार आहे.
प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांतच या सिनेमाने 1 कोटीच्या उत्पन्नाचा आकडा पार केला आहे. राज्यभरातील 232 सिनेमागृहातून दररोज 410 शोज दाखविले जात आहेत. ब-याच काळानंतर एक उत्तम थरारपट पाहिल्याचा अनुभव प्रेक्षक घेत आहेत. रंगभूमी गाजवलेलं हे नाटक, सिनेरूपातही प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी झाले हे महत्त्वाचे. माध्यमांनी देखील या सिनेमाची उत्तम दखल घेतली असून क्षणोक्षणी भय आणि उत्कंठा वाढवणारा सिनेमा तसेच उत्तम माध्यमांतर अशा विशेषणांनी गौरविले आहे. सिनेमाची गाणी संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी ठरली.
अभिनेता जॉन अब्राहम यांची पहिली मराठी सिनेनिर्मिती असलेल्या सिनेमाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे- जोशी यांनी केलंय. या चित्रपटात सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘जे.ए.एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत.
सिनेमाची कथा शेखर ताम्हाणे यांची असून लेखन व संवाद शिरीष लाटकर यांचे आहेत. मंदार चोळकर व वैभव जोशी लिखित या चित्रपटातील गीतांना निलेश मोहरीर आणि अमित राज यांचं सुश्राव्य संगीत लाभले आहे. स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, जान्हवी प्रभू–अरोरा, निशा उपाध्याय-कापाडिया या गायकांच्या सुरेल आवाजात ही गीते स्वरबद्ध झाली आहेत. योगेंद्र मोगरे, तृप्ती मधुकर तोरडमल सहनिर्माते आहेत. छायांकन प्रसाद भेंडे तर संकलन क्षितिजा खंडागळे यांचे आहे. कलादिग्दर्शन संतोष फुटाणे, ध्वनी संयोजन प्रणाम पानसरे यांचे आहे. वेशभूषा मालविका बजाज यांनी तर मेकअप विनोद सरोदे यांनी केला आहे.
महत्त्वाचं म्हणजे filmidesh.com या वेबसाईटवर सिनेमाची तिकीटे तुम्हाला ऑनलाईन बुक करता येतील.