बॉलिवूडकरांचं मराठी प्रेम काही नवीन राहिलेलं नाही. निर्मिती असो किंवा अभिनय दोन्ही माध्यमांत या कलाकारांचा उत्साही सहभाग पाहायला मिळतो. बॉलिवूडमध्ये नेहमी स्वत:साठी चोखंदळ वाट निवडणारा अभिनेता के. के. मेनन लवकरच मराठी सिनेमात पदार्पण करतोय. ही नक्कीच स्वागतार्ह गोष्ट आहे. ‘एक सांगायचंय..अनसेड हार्मेनी’ या सिनेमाद्वारे के.के मेननचं मराठीत पदार्पण होत आहे.
महत्त्वाचं म्हणजे ‘एक सांगायचंय..अनसेड हार्मेनी’ या सिनेमाद्वारे अभिनेता लोकेश गुप्ते दिग्दर्शनात पदार्पण करतोय. यंदा दस-याच्या शुभ मुहूर्तावर अभिनेता लोकेश गुप्ते दिग्दर्शित आणि के.के मेनन अभिनित ‘एक सांगायचंय..अनसेड हार्मेनी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपल्या सिनेमाबाबत उत्सुक असलेले के.के मेनन यांनी ट्विट करत ही आनंदाची बातमी दिली.
https://twitter.com/kaykaymenon02/status/1038018950162997248
या मराठी सिनेमाबद्दल एका मुलाखतीत के.के म्हणाले, “अद्याप कधीही प्रकाशझोतात न आलेल्या सामाजिक विषयावर हा सिनेमा बेतला आहे. सिनेमाच्या विषयाला मी नेहमीच महत्त्व देत आलो आहे. प्रादेशिक भाषांमधील सिनेमांचे विषय नेहमीच वैविध्यपूर्ण असतात आणि त्यातून बरंच काही शिकण्यासारखं असतं. विषय चांगला असेल तर ते काम मी भरपूर एन्जॉय करतो. लोकेश गुप्ते हे एक उत्तम अभिनेते असल्याने त्यांच्यासोबत काम करण्यास फार मजा आली.”
‘एक सांगायचंय..अनसेड हार्मेनी’ हा सिनेमा येत्या दस-याच्या मुहूर्तावर म्हणजेच 19 ऑक्टोबर 2018 ला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सर्वांनाच के के मेननच्या मराठी सिनेमाची प्रचंड उत्सुकता ाहे.