By  
on  

स्मृती इराणी यांनी केले 'अग्गबाई सासूबाई' मधील 'त्या' प्रसंगाचे कौतुक

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अभिनेत्री म्हणूनही स्वतःची कारकीर्द गाजवली आहे. उत्तमोत्तम कलाकृतींना प्रोत्साहन देण्यात त्या नेहमीच पुढाकार घेतात. नुकतंच स्मृतीजींनी स्वतःच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून त्या व्हिडिओचे कौतुक केले आहे. हा व्हिडिओ अन्य कोणताही नसून  'अग्गबाई सासूबाई'  या मालिकेतील एक विशेष व्हिडिओ स्मृती इराणी यांनी शेयर केला आहे. 

'अग्गबाई सासूबाई' मालिकेत नुकतंच एका भागात घरात असणाऱ्या आईचं महत्व सांगणारा एक प्रसंग दाखवण्यात आला. या प्रसंगात अभिनेत्री तेजश्री प्रधान आईचं महत्व सांगते. 'आई जरी घरात असली तरी तिला असंख्य कामं असतात...' अशा सुंदर वाक्यांनी सजलेला हा प्रसंग सर्वांच्या पसंतीस पडला. अनेक जणांनी या प्रसंगाचा स्पेशल व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सुद्धा स्वतःच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट करून आईचं महत्व दर्शवणारं कॅप्शन या व्हिडिओखाली लिहीलं आहे. 

'भाषा वेगवेगळ्या असल्या तरी भावना एकच आहे. आई, माँ, मॉम या आईला संबोधणाऱ्या भाषा जरी वेगळ्या असल्या तरी आईला एक घट्ट मिठी तिच्याबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी पुरेशी असते.' असं कॅप्शन स्मृती इराणी यांनी या व्हिडिओखाली लिहिलं आहे. वेगळं कथानक आणि कलाकारांचा उत्तम अभिनय या गोष्टींमुळे 'अग्गबाई सासूबाई' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive